वॉशिंग्टन/सना – अमेरिकेने येमेनमधील हौथी बंडखोरांवर निर्बंध लादल्याची घोषणा केली आहे. हौथी बंडखोरांना अर्थसहाय्य पुरविणार्या मध्यस्थांना तसेच कंपन्यांना याद्वारे लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. बायडेन प्रशासनाने हौथींवर निर्बंध लादण्याची वर्षभरातील ही दुसरी वेळ ठरते. हौथी बंडखोर युएई तसेच सौदीच्या प्रमुख शहरांवर हल्ले चढवित असताना संयुक्त राष्ट्रसंघ बघ्याची भूमिका स्वीकारत असल्याी टीका युएईने नुकतीच केली होती. त्यानंतर अमेरिकेला हौथी बंडखोरांवर ही कारवाई करावी लागल्याचे दिसत आहे.
गेल्या काही महिन्यात हौथी बंडखोरांनी युएई व सौदीवरील हल्ले तीव्र केले आहेत. या दोन्ही देशांवर ड्रोन हल्ले चढविण्यात आले असून क्षेपणास्त्रांचा माराही सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच युएईने संयुक्त राष्ट्रसंघात हा मुद्दा उपस्थित केला होता. येमेनमधील हौथी बंडखोरांवरील कारवाई तसेच निर्बंधांबाबत युएईच्या राजदूतांनी प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेली ही निर्बंधांची घोषणा करणे लक्ष वेधून घेणारी ठरते.
अमेरिकेच्या नव्या निर्बंधांमध्ये काही कंपन्या तसेच जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. या कंपन्या व जहाजाचे नेटवर्क आखात, आशिया व आफ्रिकेतील व्यवहारांच्या माध्यमातून हौथी बंडखोरांना सहाय्य पुरवित असल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. ‘वारंवार वाटाघाटींचे अवाहन करूनही हौथी बंडखोर व त्यांचे नेते येमेनच्या शेजारी देशांवर क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले करीत आहेत. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत’, असा ठपका ठेवून अमेरिकेच्या कोषागार विभागाने या निर्बंधांचे समर्थन केले आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेनेच इराणसंलग्न हौथी बंडखोरांना ‘टेरर लिस्ट’मधून बाहेर काढले होते.
त्यावेळी सौदी अरेबिया, युएई व इतर अरब देशांनी केलेल्या आवाहनाची पर्वा अमेरिकेने केली नव्हती. अमेरिकेच्या निर्णयानंतर हौथी बंडखोरांनी आपल्या हल्ल्यांची तीव्रता वाढविली होती. यावर सुरू झालेली तीव्र टीका लक्षात घेऊन अमेरिकेने हौथी बंडखोरांवर नव्या निर्बंधांचा निर्णय घेतल्याचे दिसते. मात्र अमेरिकेच्या या कारवाईवर आखातातील मित्रदेश फारसे समाधानी नसल्याचे उघड होत आहे.
सौदी व युएईकडून अमेरिकेने हौथींना पुन्हा दहशतवादी घोषित करावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र बायडेन प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. बायडेन प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच हौथी बंडखोरांना अधिक बळ मिळत असल्याचे आरोप आखाती देश करीत आहेत.