वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेच्या ‘सेवन्थ फ्लिट’मधील विनाशिकेने दोन दिवसांपूर्वी तैवानच्या आखातातून गस्त घातली. हा नियमित कारवाईचा भाग असल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे. पण चीनच्या ‘ईस्टर्न थिअटर कमांड’ने अमेरिकन नौदलाची कारवाई चीनला चिथावणी देणारी ठरते, असा इशारा दिला. रशियाने जसा युक्रेनवर हल्ला चढविला, त्याचे अनुकरण करून चीन तैवान ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई करील, असे जपानच्या माजी पंतप्रधानांनी नुकतेच बजावले होते. त्या पार्श्वभूमीवर तैवानच्या आखातातील या हालचालींचे गांभीर्य प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
जपानच्या योकोसूका बंदरावर तैनात अमेरिकेच्या सेवन्थ फ्लिटमधील ‘युएसएस राल्फ जॉन्सन’ या विनाशिकेने शनिवारी उशीरा तैवानच्या आखातातून प्रवास केला. आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीच्या नियमांचा आदर कायम ठेवून ही गस्त पार पाडल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले होते. मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासंबंधी अमेरिका वचनबद्ध असून त्याअंतर्गत ही कारवाई केल्याचे अमेरिकन सेवन्थ फ्लिटचे प्रवक्ते लेफ्टनंट निकोलस लिंगो यांनी स्पष्ट केले.
आत्तापर्यंत तैवानच्या आखातातून अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका, विनाशिका तसेच हवाई क्षेत्रातून लढाऊ विमानांनी गस्त पूर्ण केल्या आहेत. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी अमेरिकेच्या या कारवाईत काहीही विशेष नसल्याचे म्हटले होते. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दरवेळी तैवानच्या आखातातील अमेरिकेच्या गस्तीवर आक्षेप नोंदविला. पिपल्स लिबरेशन आर्मीच्या ‘ईस्टर्न थिअटर कमांड’ने अमेरिकेची ही गस्त प्रक्षोभक असल्याचे दावे केले होते.
चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने अमेरिकन विनाशिकेच्या गस्तीवर ताशेरे ओढले आहेत. अमेरिका जगाच्या दोन्ही बाजूला संघर्ष भडकवित असल्याचा आरोप चिनी मुखपत्राने केला. ‘सध्या युक्रेन-रशियातील संघर्ष तीव्र होत चालला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे लष्कर जगाच्या दुसर्या बाजूला आपले सामर्थ्य प्रदर्शन करून युरोप आणि आशियामध्ये एकाचवेळी संघर्ष भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. या कारवाईद्वारे अमेरिका तैवानमधील स्वातंत्र्याची मागणी करणार्या गटांना चुकीचा संदेश देत आहे’, असा आरोप ग्लोबल टाईम्सने लष्करी विश्लेषकांच्या हवाल्याने केला.
त्याचबरोबर अमेरिकेतील काही कट्टरपंथी राजकारणी युक्रेनमधील संघर्षाचा फायदा घेऊन तैवानबाबत नवे संकट निर्माण करीत आहेत, तसेच तैवानमधील विघटनवादी गटांना मजबूत करीत असल्याचा ठपका चिनी मुखपत्राने ठेवला. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांच्यासह स्वतंत्र तैवानचे समर्थन करणार्या तैवानमधील लोकशाहीवादी गटांना चीन विघटनवादी ठरवित आहे.
युक्रेनवरील रशियाच्या कारवाईनंतर चीनकडूनही तैवानवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते. अमेरिकेतील लोकप्रतिनिधी व लष्करी विश्लेषक याबाबतचे इशारे देत आहेत. या पार्श्वभूमीवर, तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी अमेरिकेकडे अतिरिक्त लष्करी सहाय्याची मागणी केली होती.
गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनच्या हल्ल्यांपासून अमेरिका तैवानचे संरक्षण करील, असे जाहीर केले होते. पण यावर चीनमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी अमेरिकेची भूमिका मांडली होती. चीनने तैवानवर हल्ला चढविल्यानंतर अमेरिका तैवानला लष्करी सहाय्य पुरविल, असे सांगून चीनविरोधात उघड संघर्षात उतरणार नसल्याचे संकेत बायडेन प्रशासनाने दिले होते.
अमेरिकेने अशीच भूमिका युक्रेन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांबाबतही स्वीकारली आहे. सध्या युक्रेन-रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षानंतर सावध झालेल्या जपानने अमेरिकेला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. तैवानच्या सुरक्षेबाबत अमेरिकेने धरसोडीचे धोरण सोडून द्यावे व चीनच्या हल्ल्यांपासून अमेरिका तैवानची सुरक्षा करील, असे जाहीर करावे, अशी मागणी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी काही तासांपूर्वीच केली होती.