तुर्कीची रशियाच्या विरोधात आक्रमक घोषणा

- बॉस्फोरसच्या आखातात रशियन विनाशिकांची कोंडी करण्याची तयारी

 इस्तंबूल – आत्तापर्यंत युक्रेन आणि रशियामधील युद्धात कुणाचीही बाजू घेण्याचे नाकारणार्‍या तुर्कीने आता आपल्या धोरणात फार मोठा बदल केला. रशियाने युक्रेनबरोबर युद्धच पुकारलेले आहे, असा ठपका ठेवून तुर्कीने ब्लॅक सीच्या क्षेत्रात रशियन विनाशिकांची कोंडी करण्याची घोषणा केली. युक्रेनने तशी मागणी तुर्कीकडे केली होती. सुरूवातीला तुर्कीने त्याला नकार दिला होता. पण आता मात्र तुर्कीने पूर्णपणे रशियाविरोधी भूमिका स्वीकारली आहे.

गेल्या आठवड्यात रशियन लष्कराने युक्रेनला घेरण्यास सुरुवात केली होती. रशियाचे नौदल ब्लॅक सी व त्यापुढील अझोव्हच्या सागरी क्षेत्रात दाखल झाले होते. त्यानंतर युक्रेनने तुर्कीला बॉस्फोरसचे आखात बंद करून ब्लॅक सीमध्ये रशियन बिनाशिकांची कोंडी करण्याचे आवाहन केले होते. यासाठी युक्रेनने तुर्की हा नाटोचा सदस्य देश असल्याची आठवण करून दिली होती. पण ‘मोंट्रिक्स कन्व्हेन्शन’चे कारण देऊन ब्लॅक सीची कोंडी शक्य नसल्याचे तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी म्हटले होते.

पण अवघ्या दोन दिवसात तुर्कीच्या धोरणात मोठा बदल झाला असून राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या सरकारने उघडपणे रशियाविरोधात भूमिका स्वीकारली आहे. गेल्या चार दिवसांपासून रशिया-युक्रेनमधील संघर्षाचा उल्लेख करताना युद्ध किंवा घुसखोरी असे करण्याचे तुर्कीने टाळले होते. पण रविवारी परराष्ट्रमंत्री कावुसोग्लू यांनी रशियाने युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप केला.

‘रशियाने युक्रेनवर एखाददुसरा हवाई हल्ला चढविलेला नाही, तर अधिकृतरित्या युद्ध पुकारले आहे. त्यामुळे तुर्की मोंट्रेक्स कन्व्हेन्शनची अंमलबजावणी करील’, असे सांगून परराष्ट्रमंत्री कावुसोग्लू यांनी अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीर केले. मोंट्रेक्स कन्व्हेन्शननुसार, युद्धकाळात तुर्कीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर बॉस्फोरस आणि दर्दानिलेसचे आखात बंद करण्याचे अधिकार तुर्कीकडे आहेत. तुर्की नेमके हेच करण्याच्या तयारीत असून याद्वारे ब्लॅक सीच्या क्षेत्रात रशियन विनाशिका व पाणबुड्यांची कोंडी केली जाईल. यामुळे रशियन नौदलाला भूमध्य समुद्रातून ब्लॅक सीच्या क्षेत्रात प्रवेश मिळणार नाही. या निर्णयाचा सर्वाधिक फटका युक्रेन व तुर्कीलाच बसणार असल्याचा दावा केला जातो. कारण २०२० साली युक्रेनने कडधान्यांची ९५ टक्के निर्यात बॉस्फोरसच्या आखातातून केली होती. तर या सागरी क्षेत्रातील व्यापार आणि पर्यटनावर तुर्कीची तळागाळाला गेलेली अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

दरम्यान, हा निर्णय घेऊन तुर्कीने नाटोबरोबरील आपले संबंध सुधारण्यासाठी पाऊल उचलल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक व माध्यमे करीत आहेत. गेल्या वर्षभराहून अधिक काळ तुर्कीची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्याचबरोबर रशियाकडून एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केल्यामुळे अमेरिका, नाटोसह तुर्कीच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता.

अशा परिस्थितीत, अमेरिकेची मर्जी राखण्यासाठी आणि नाटोचे सहकार्य मिळविण्यासाठी तुर्कीने हा निर्णय घेतल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मात्र यामुळे तुर्कीने रशियाबरोबरचे सहकार्य धोक्यात टाकल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply