१३ दिवसांच्या युद्धात युक्रेनची दैना उडाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की रशियाबरोबर चर्चा करण्यास तयार

किव्ह – १३ दिवसांच्या युद्धात युक्रेनची अतोनात हानी झाल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी दाखवली. युक्रेनला सहभागी करून घेण्याची धमक नाटोकडे नाही, असे जाहीर करून झेलेन्स्की यांनी युक्रेन तटस्थ राहण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमिआ, लुहान्स आणि डोनेस्क या भूभागावरही चर्चा होऊ शकते, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

रशिया व युक्रेनचे प्रतिनिधी बेलारूसमध्ये चर्चा करीत होते. दोन्ही देशांमधील चर्चेचा हा तिसरा टप्पा होता. यात रशियाने आपल्या मागण्या पुन्हा एकदा युक्रेनच्या शिष्टमंडळासमोर ठेवल्या. या मागण्यांबरोबरच युक्रेनला रशियाने निर्णायक इशाराही दिला होता. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीच याची माहिती माध्यमांना दिली. रशियाच्या निर्णायक इशार्‍यासमोर आम्ही झुकणार नाही. पण रशियाच्या मागण्यांवर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.

Putinनाटोमध्ये युक्रेनने सहभागी होऊ नये, ही रशियाची पहिली अट होती. पण आता नाटोच आम्हाला सहभागी करून घ्यायला तयार नाही, असे सांगून नाटो रशियाला घाबरत असल्याची टीका झेलेन्स्की यांनी केली. १३ दिवसांच्या युद्धात युक्रेनची दैना उडाल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आता रशियाची प्रमुख मागणी मान्य करीत आहेत. इतकेच नाही तर रशियाकडून क्रिमिआचा भूभाग परत मिळविण्याचे दावे करणारे झेलेन्स्की आता क्रिमिआबाबत रशियाशी तडजोड करायला तयार झाले आहेत.

डोंबास प्रांतातील लुहान्स्क आणि डोनेस्क हे स्वतंत्र देश असल्याचे रशियाने जाहीर केले होते. त्याबाबतही चर्चा होऊ शकते, असे सांगून झेलेन्स्की यांनी युक्रेन रशियाच्या जवळपास सर्वच प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी आपण तयार झाल्याचे संकेत देत आहेत. मात्र असे असले तरी अमेरिकेने युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे पाठविली असून त्यामुळे युक्रेनचे युद्ध अधिक संहारक बनेल, अशी शक्यताही समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर, झेलेन्स्की यांनी स्वीकारलेली ही तडजोडीची भूमिका म्हणजे बनाव आहे की खरोखरच त्यांना हे युद्ध रोखायचे आहे, ते अजूनह सुस्पष्ट झालेले नाही.

युक्रेनच्या पाच शहरांमध्ये संघर्षबंदी लागू केल्यानंतरही, रशियन सैन्य युक्रेनच्या इतर भूभागावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू ठेवल्या आहेत. खारकिव्ह शहरात रशियन सैन्याचे जनरल व्हिटाली गेरासिमो यांना ठार केल्याची माहिती युक्रेनने जाहीर केली आहे. तर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनने युरोपिय देशात अमेरिकेचे जवळपास एक लाख जवान तैनात असल्याची घोषणा केली आहे. तसेच नाटोने युक्रेनमधील युद्ध युक्रेनच्या बाहेर पसरता कामा नये, असे बजावले आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्‍या पोलंड व इतर शेजारी देशांवर रशिया हल्ले चढवील, असे दावे केले जातात. त्या पार्श्‍वभूमीवर, नाटोने हा इशारा दिला. त्याचवेळी युक्रेनमधील युद्धाच्या आगीत युरोपातले इतर देशही होरपळतील, हे लक्षात आल्यानंतर, युरोपिय देशांच्या भूमिकेत लक्षणीय बदल झाल्याचे दिसते आहे.

leave a reply