सौदी अरेबिया व चीनदरम्यान ड्रोन निर्मितीसह इंधन करारांवर स्वाक्षर्‍या

रियाध/बीजिंग- सौदी अरेबियाच्या ‘एसीईएस’ कंपनीने चीनबरोबर ‘मिलिटरी ड्रोन्स’च्या निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. हा करार सौदी अरेबिया व चीनमधील वाढत्या संरक्षण सहकार्याचे संकेत मानले जातात. गेल्या वर्षभरात लष्करी व संरक्षणक्षेत्रातील सहकार्यावरून सौदी व अमेरिकेत मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर सौदीने चीनबरोबर केलेला करार लक्ष वेधून घेणारा ठरतो. यापाठोपाठ सौदी अरेबिया व चीनदरम्यान २८ अब्ज डॉलर्सच्या करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या असून त्यात १० अब्ज डॉलर्सच्या इंधन कराराचा समावेश आहे.

आखाती देशांमधून सर्वाधिक इंधन आयात करणारा देश म्हणून चीन गेल्या काही वर्षात पुढे आला आहे. इंधनाची आयात करतानाच चीनने आखाती देशांमधील आपला प्रभाव वाढविण्यासाठीही पावले उचलली आहेत. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने आखाती मित्रदेशांबरोबरील सहकार्य घटविल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेने सौदी अरेबिया आणि युएईतील आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणा माघारी घेतल्या होत्या. तसेच बॉम्बर विमाने देखील काढून घेतली होती. या घटनांनी आखाती देश दुखावले असून चीनबरोबर सहकार्य वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

जानेवारी महिन्यात सौदी अरेबियासह ओमान, कुवेत व बाहरिनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरिय शिष्टमंडळाने चीनचा दौरा केला होता. त्यानंतर काही दिवसांमध्येच सौदी अरेबिया व चीनच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान व्हर्च्युअल बैठक पार पडली होती. त्यात सौदीचे उपसंरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी चीनबरोबरचे लष्करी सहकार्य उच्च स्तरावर नेण्यात येईल, असा विश्‍वास व्यक्त केला होता. दोन देशांमध्ये ड्रोन निर्मितीसाठी झालेला करार त्याचाच भाग दिसत आहे.

या करारानुसार, सौदी अरेबियातील ‘एसीईएस’ ही कंपनी ‘चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ग्रुप कंपनी’च्या सहकार्याने ‘मिलिटरी ड्रोन्स’ची निर्मिती करणार आहे. सौदी अरेबिया व चीनमध्ये ड्रोन्सच्या निर्मितीसाठी झालेला हा पाच वर्षातील दुसरा मोठा करार ठरला आहे. दरम्यान, सौदी अरेबियाचे शिष्टमंडळ चीनच्या दौर्‍यावर असून या दौर्‍यात दोन देशांमध्ये २८ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा समावेश असलेल्या ३५ करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या सौदी ऍराम्को या इंधनकंपनीच्या १० अब्ज डॉलर्सच्या कराराचाही समावेश आहे.

leave a reply