पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न

उच्चस्तरीय बैठकनवी दिल्ली – रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत देशाच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेण्यात आला. तसेच युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी सर्व प्रयत्न करा, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिल्याचे वृत्त आहे.

युक्रेन व रशियामध्ये युद्धाचा भडका उडाल्यावर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. तर रविवारी पुन्हा एकदा अशीच बैठक पार पडली आहे. भारताने युक्रेनच्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतली आहे व आपण शांततेच्या बाजूने असून राजनैतिक मार्गाने दोन्ही देशांनी तोडगा काढवा, अशी भूमिका भारताने मांडलेली आहे. गेल्या काही दिवसात पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर दोनवेळा चर्चा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर अचानक आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे महत्त्व वाढते.

युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचे अधिक तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी भारताने युक्रेनमध्ये राबविलेल्या ‘ऑपरेशन गंगा’चाही आढावा घेण्यात आला. तसेच युक्रेनमध्ये मृत्यू पावलेल्या भारतीय विद्यार्थ्याचे पार्थिव परत आणण्यासंदर्भातही पंतप्रधान मोदी यांनी सूचना केल्या.

यावेळी देशाच्या संरक्षण सज्जतेचा आढावाही घेण्यात आला. भारताला कोणत्याही परिस्थितीत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. यामुळे आपल्या देशांची सुरक्षा मजबूत होईल, याशिवाय अर्थव्यवस्थाही बळकट होईल, अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मांडली. त्यामुळे या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी सर्व प्रयत्न करा, असे निर्देश वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांना दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तसेच भारताच्या सीमेवरील सद्य परिस्थितीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. याशिवाय सागरी व हवाई सुरक्षा व आधुनिक तंत्रज्ञान मिळविण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली.

leave a reply