दुबई/वॉशिंग्टन – सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांनी युएईचा दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद अल-नह्यान यांची भेट घेतली. २०११ सालानंतर पहिल्यांदाच सिरियन राष्ट्राध्यक्षांनी युएईचा दौरा केला. यामुळे गेले दशकभर एकमेकांच्या विरोधात असलेले सिरिया व युएई नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा आखातातील माध्यमे करीत आहेत. पण अस्साद यांच्या युएई दौर्यावर अमेरिकेने टीका केली. युएईच्या या भूमिकेने आपली घोर निराशा झाल्याची नाराजी अमेरिकेने व्यक्त केली.
२०११ साली अरब-आखाती देशांमध्ये अरब स्प्रिंगचे आंदोलन भडकले होते. सिरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांच्या राजवटीविरोधात सुरू असलेले हे आंदोलन चिरडण्यासाठी लष्कराने हिंसक कारवाई केली. यामुळे सिरियामध्ये अस्साद राजवटीविरोधात सशस्त्र संघर्ष उभा राहिला. अस्साद राजवटीला वाचविण्यासाठी रशिया, इराण या संघर्षात उतरल्यानंतर अमेरिका, युरोपिय मित्रदेश तसेच सौदी अरेबिया, युएई व इतर अरब देशांनी सिरियातील सशस्त्र बंडखोरांना आपले समर्थन दिले.
यानंतर सौदी व युएईने सिरियाला अरब-आखाती तसेच इस्लामी देशांच्या संघटनेतून बहिष्कृत केले होते. यामुळे सिरिया व अरब देशांमधील संबंध बिघडले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून सौदी व युएईने शेजारी अरब देशांबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच युएईने कतार व तुर्कीच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. तर शुक्रवारी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अस्साद युएईत दाखल झाले.
सिरियन राष्ट्राध्यक्षांनी युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद तसेच पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मखतूम यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमध्ये नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यावर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया आली.
सिरियन जनतेच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या अस्साद यांच्याशी चर्चा करून युएई सिरियन राष्ट्राध्यक्षांच्या कृत्याचे समर्थन करीत असल्याची टीका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केली. त्याचबरोबर युएईने अस्साद राजवटीबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याच्या आपल्या निर्णयावर फेरविचार करावा, असे आवाहन प्राईस यांनी केले.
दरम्यान, बायडेन प्रशासनाने इराणबाबत स्वीकारलेल्या भूमिकेमुळे आखाती देश अमेरिकेवरील विश्वास गमावत असल्याची टीका अमेरिकेतील लोकप्रतिनिधी व विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे आखाती देश अमेरिकेला वगळून स्वतंत्र आघाडी उभारीत असल्याचा इशारा अमेरिकी विश्लेषक देत आहेत.