वॉशिंग्टन/बीजिंग – चीनने साऊथ चायना सीमधील तीन बेटांचे पूर्णपणे लष्करीकरण केले असून ही दुसर्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी संरक्षणतैनाती असल्याचा आरोप अमेरिकेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी केला. अमेरिकेची इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तैनाती या भागातील युद्ध रोखण्यासाठी आहे, मात्र गरज भासल्यास अमेरिका चीनविरोधात युद्धात उतरून हे युद्ध जिंकेल, असा इशाराही ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी दिला.
चीन गेल्या दोन दशकांहून अधिक काळ साऊथ चायना सीमधील संरक्षण तैनाती वाढवित आहे. या क्षेत्रातील ‘मिस्चिफ रीफ’, ‘सुबी रीफ’ व ‘फिअरी क्रॉस’ या भागात उभारलेल्या कृत्रिम बेटांवर चीनने आपली संरक्षणतैनाती पूर्ण केल्याचा आरोप अमेरिकी अधिकार्यांनी केला. या कृत्रिम बेटांवर चीनने क्षेपणास्त्रांसह, लढाऊ विमाने, युद्धनौका, शस्त्रांची कोठारे तसेच रडार सिस्टिम्स उभारल्या असल्याचे ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी सांगितले. चीनच्या या तैनातीचा उल्लेख करताना ही दुसर्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी तैनाती असल्याकडे अमेरिकी अधिकार्यांनी लक्ष वेधले.
चीनच्या या तैनातीने साऊथ चायना सी क्षेत्रातील इतर देशांना तसेच वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाल्याचा इशारा ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आश्वासन दिल्यानंतरही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती झाल्याचे अमेरिकी अधिकार्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिकमधील तैनातीचाही उल्लेख करून सदर तैनाती या क्षेत्रातील युद्ध टाळण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकेने चीनला रोखण्यासाठी उचललेली पावळे अपयशी ठरली तर चीनविरोधात युद्धात उतरून अमेरिका युद्ध जिंकेल, असा दावाही ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी केला. चीनने साऊथ चायना सी प्रकरणात आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेला निर्णय धुडकावून संपूर्ण सागरी क्षेत्र आपलेच असल्याचा दावा केला आहे. यामुळे आग्नेय आशियाई देश अस्वस्थ असून चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी या देशांनीही आपली संरक्षणतैनाती मोठ्या प्रमाणात वाढविण्यास सुरुवात केली आहे.