चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका व युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

बीजिंग/वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – जग कोरोनाच्या साथीतून बाहेर पडत असल्याचे दावे होत असतानाच पुन्हा एकदा संसर्गाची व्याप्ती वाढू लागली आहे. चीन व दक्षिण कोरिया या आशियाई देशांसह अमेरिका तसेच युरोपमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढते आहे. ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’चा उपप्रकार असलेल्या ‘बीए डॉट२’(इअ.२) या व्हेरिअंटमुळे रुग्णसंख्येत भर पडत आहे. अमेरिका तसेच युरोपात नवी लाट येण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. दक्षिण कोरियात सोमवारी साडेतीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या एक कोटींवर गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

२०१९ साली चीनच्या वुहान शहरातून कोरोना साथीला सुरुवात झाली होती. त्यानंतर २०२० व २०२१मध्ये या साथीने जगभरात हाहाकार उडविला होता. कोरोनाच्या मूळ विषाणूत बदल होऊन नवे व्हेरिअंट तयार झाल्याने विविध देशांमध्ये साथीच्या नव्या लाटा येत राहिल्या. काही व्हेरिअंट लस व इतर उपाययोजनांना दाद देत नसल्याने रुग्णसंख्या तसेच बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत राहिली. आतापर्यंत कोरोनाच्या साथीने जगभरात सुमारे ६१ लाख जणांचा बळी घेतला असून रुग्णसंख्या ४७ कोटींवर पोहोचली आहे.

लॉकडाऊन, इतर कठोर निर्बंध व लसीकरणाचे वाढते प्रमाण यामुळे गेल्या वर्षाच्या अखेरीस व या वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढण्यास सुरुवात झाल्याचे दिसते. चीन, दक्षिण कोरिया या आघाडीच्या आशियाई देशांपाठोपाठ अमेरिका व युरोपिय देशांमध्येही रुग्णसंख्येत वेगाने भर पडत असल्याची माहिती आली आहे.

दक्षिण कोरियात गेले काही दिवस दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. सोमवारी तीन लाख ५३ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या एक कोटींवर पोहोचली आहे. पुढील काही दिवस प्रतिदिन लाखांहून अधिक रुग्ण आढळणे सुरू राहिल, असा दावा स्थानिक आरोग्ययंत्रणा व तज्ज्ञांनी केला. सरकारने शिथिल केलेले निर्बंध व ओमिक्रॉन व्हेरिअंटचा उपप्रकार यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत दक्षिण कोरियात कोरोनामुळे १३ हजारांहून अधिक जण दगावले आहेत.

दोन वर्षांपूर्वीच कोरोनावर विजयाचे दावे करणार्‍या चीनमध्ये एकापाठोपाठ येणार्‍या नव्या उद्रेकांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. सोमवारपासून चीनने दोन प्रमुख शहरांमध्ये कठोर निर्बंधांची घोषणा केली असून यात जिलिन व शेनयांग या शहरांचा समावेश आहे. दोन्ही शहरांची एकत्रित लोकसंख्या सव्वा कोटींहून अधिक असून शेनयांग हे आघाडीचे औद्योगिक शहर म्हणून ओळखण्यात येते. शेनयांगपूर्वी शेन्झेन व शांघाय या प्रमुख चिनी शहरांमध्येही निर्बंध लादण्यात आले आहेत.

चीनमधील उद्रेक व निर्बंधांचा फटका आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेस बसण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये सक्रिय असणार्‍या वाहन, तंत्रज्ञान तसेच मशिनरी उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांना आपले उत्पादन बंद ठेवणे भाग पडले आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीला धक्के बसण्यास सुरुवात झाली असून चीनमधून होणारी निर्यात घटण्यास सुरुवात झाली आहे. याचे परिणाम चीनच्या तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरही होतील, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील आघाडीच्या आरोग्यतज्ज्ञांनी ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’चा उपप्रकार असलेल्या ‘बीए डॉट२’मुळे देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सल्लागार असलेल्या अँथनी फॉसी तसेच सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी वाढत्या रुग्णसंख्येकडे लक्ष वेधत कोरोना संपलेला नाही, असे बजावले.

leave a reply