अमेरिकेला तैवानबाबतचे अस्पष्ट धोरण बदलावेच लागेल

- अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा इशारा

माईक पॉम्पिओतैपेई/वॉशिंग्टन/बीजिंग – ‘कोणत्याही एका बाजूला ठामपणे न राहता मधली भूमिका घेणे किती धोकादायक ठरु शकते, हे युक्रेन युद्धाने दाखवून दिले आहे. एकाधिकारशाही राबविणारे राज्यकर्ते या संदिग्धतेचा वापर करु शकतात. त्यामुळे आता अमेरिकेने तैवान हे स्वतंत्र राष्ट्र आहे, ही बाब उघडपणे मान्य करायला हवी’, अशी मागणी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूट या अभ्यासगटाने आयोजित कार्यक्रमात ही मागणी करताना पॉम्पिओ यांनी, तैवान हा चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा भाग नाही याचा पुनरुच्चारही केला.

माईक पॉम्पिओरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तैवानवर हल्ला करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत असल्याचे माध्यमे व विश्‍लेषक वारंवार बजावत आहेत. ही शक्यता लक्षात घेऊन अमेरिका तैवानबाबत अधिक सक्रिय होत असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेने आपली विनाशिका तैवानच्या सागरी क्षेत्रात धाडली होती. अमेरिकेच्या एका शिष्टमंडळानेही तैवानला भेट दिली होती.

माईक पॉम्पिओअमेरिकेनेे नवी ‘इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी’ही जाहीर केली आहे. त्यात तैवानच्या संरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. अमेरिका तैवानला स्वसंरक्षणाची क्षमता पुरविण्यासाठी सहाय्य पुरवेल, असा उल्लेखही इंडो-पॅसिफिक धोरणात आहे. असे असले तरी अमेरिकेचे सरकार तैवानबाबतची आपली धोरणात्मक संदिग्धता बदलण्यास तयार नाही. तैवानशी मर्यादित राजनैतिक व व्यापारी संबंध राखून संरक्षणसहाय्य पुरवित राहण्यावरच अमेरिकेने आतापर्यंत भर दिला आहे. याबाबत अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांनी आतापर्यंत दुटप्पी भूमिका घेतल्याची कबुलीही माजी परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

मात्र चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला तैवानवरील ताब्याबाबत फेरविचार करणे भाग पाडायचे असेल तर अमेरिकेने जुने धोरण बदलणे गरजेचे असल्याचे पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वी तैवानच्या दौर्‍यातही पॉम्पिओ यांनी, अमेरिका सरकार व जनतेने तैवान हे मुक्त व सार्वभौम राष्ट्र असल्याचे वास्तव मान्य करण्याची गरज आहे, असे आवाहन केले होते.

leave a reply