रियाध/सना – संयुक्त राष्ट्रसंघाच्या आवाहनानुसार सौदी अरेबियाने बुधवारपासून येमेनमध्ये एकतर्फी संघर्षबंदी जाहीर केली. येत्या काही दिवसात इस्लामधर्मियांचा पवित्र सण सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सौदीने ही संघर्षबंदी घोषित केली. पण सौदीच्या या संघर्षबंदीला काहीही अर्थ नसल्याचे सांगून हे आपल्याला मान्य नसल्याचे हौथी बंडखोरांनी जाहीर केले. गेल्या चार महिन्यात सौदीने दुसर्यांदा येमेनमध्ये संघर्षबंदी लागू केली आहे.
गेल्या सात वर्षांपासून येमेनमध्ये भडकलेल्या गृहयुद्धात एक लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून यात भूकबळींची संख्या ८५ हजार असल्याचा दावा केला जातो. या गृहयुद्धामुळे येमेनी मुलांवर कुपोषणाचे मोठे संकट कोसळल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने वर्तविली होती. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रसंघाने येमेनमधील संघर्षात सहभागी झालेल्या दोन्ही गटांना संघर्षबंदीचे आवाहन केले होते.
सौदी अरेबियाने याचा स्वीकार करून बुधवारपासूनच संघर्षबंदीची घोषणा केली. सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांची लष्करी आघाडी पुढील काही दिवस येमेनवर हल्ले चढविणार नसल्याचे या लष्करी आघाडीचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी जाहीर केले. ही संघर्षबंदी किमान महिनाभरासाठी असेल, असे सौदीने जाहीर केले आहे. सौदीच्या या निर्णयाचे अमेरिका तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने स्वागत केले.
मात्र ‘अन्सरुल्ला रेझिस्टन्स मुव्हमेंट’ अर्थात हौथी बंडखोरांच्या गटाने सौदीचा हा एकतर्फी संघर्षबंदी धुडकावली. सौदीची ही घोषणाच निरर्थक असल्याचा आरोप हौथी बंडखोरांच्या संघटनेने केला. सौदी व अरब देशांनी आपल्या लष्कराच्या साथीने येमेनची कोंडी केली आहे. ही कोंडी कायम असेपर्यंत संघर्षबंदीच्या घोषणेला काहीही अर्थ उरत नसल्याची टीका हौथी संघटनेचा नेता मोहम्मद अल-बुखैती याने केली.
याआधीही सौदीने हौथी बंडखोरांबरोबर संघर्षबंदीची घोषणा करून शांतीचर्चेची मागणी केली होती. पण हौथी बंडखोरांनी सौदीची ही मागणी धुडकावून रॉकेट्स, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचे हल्ले सुरू ठेवले आहेत. गेल्या महिन्याभरात हौथी बंडखोरांनी सौदीची राजधानी रियाधला सातत्याने लक्ष्य केले होते. तसेच हौथींनी सौदीच्या ‘अराम्को’ या सर्वात महत्त्वाच्या इंधन कंपनीच्या प्रकल्पांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले आहेत. यानंतर खवळलेल्या सौदी व अरब देशांच्या लष्करी आघाडीने हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई हल्ले चढविले होते.