काबुल – पाकिस्तानात राजकीय उलथापालथी सुरू असतानाच ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान दिले आहे. तेहरिकने पाकिस्तानी लष्कराविरोधात ‘अल बदर’ या दहशतवादी मोहिमेची घोषणा केली असून लवकरच पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले जाईल, अशी धमकी तेहरिकने दिली. फक्त पाकिस्तानातच नाही तर अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे हस्तक, समर्थकांचा देखील बंदोबस्त करण्याचे तेहरिकने जाहीर केले.
‘तेहरिक-ए-तालिबान’ अर्थात तेहरिकने सोमवारी पाकिस्तानी लष्कराविरोधात विशेष मोहीम छेडण्याची घोषणा केली. ड्युरंड लाईनवर तैनात पाकिस्तानी जवान आणि सुरक्षा चौक्यांवर आत्मघाती हल्ले, बॉम्बहल्ले आणि गोळीबार केला जाईल, असे तेहरिकने आपल्या इशार्यात म्हटले आहे. ड्युरंड लाईनवर तैनात पाकिस्तानी जवान आपल्या निशाण्यावर असतील, असे तेहरिकने स्पष्ट केले. त्याचबरोबर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेसाठी अफगाणिस्तानात कुरापती करणारे छुपे हस्तक आणि समर्थकांवर देखील हल्ले चढविण्याची घोषणा तेहरिकने केली. या हल्ल्यांसाठी तेहरिकचे ५०० हून अधिक दहशतवादी पाकिस्तानच्या पख्तूनख्वा भागात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहेत.
गेल्या चार दिवसात तेहरिकने पाकिस्तानला दिलेला हा दुसरा इशारा आहे. गेल्याच आठवड्यात तेहरिकने पाकिस्तानात जोरदार हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रविवारी रात्री पेशावरच्या बदाबेर गावातील सुरक्षा चौकीवर हल्ला झाला. तेहरिकने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच आपल्या या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराला मोठी जीवितहानी सोसावी लागल्याचा दावा तेहरिकने केला. पाकिस्तानी लष्कराने या हल्ल्याचे तपशील देण्याचे टाळले. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने पाकिस्तानी लष्कराच्या या भूमिकेवर टीका केली आहे. स्थानिक बंडखोर टोळ्या आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे जवान मोठ्या संख्येने मारले जात आहेत. पण पाकिस्तानी लष्कर आपल्या मृत जवानांची संख्या लपवित असल्याचा ठपका या वृत्तसंस्थेने ठेवला. पाकिस्तानातील काही वृत्तसंस्था देखील तेहरिककडून लष्करावर वाढलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधत आहेत.
सध्या पाकिस्तानात फार मोठ्या राजकीय उलथापालथी सुरू आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या बेजबाबदार निर्णयांमुळे पाकिस्तानात घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे. आपले सरकार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय कारस्थान आखण्यात आले असून त्यात विरोधी पक्ष सहभागी झाल्याचे आरोप इम्रान खान करीत आहेत. तसेच पाकिस्तानच्या लष्करावरही इम्रान खान यांनी अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले आहेत.
यामुळे पाकिस्तानात राजकीय विसंवाद वाढत चालला असून याचे संघर्षात रुपांतर होईल, अशी भीती विश्लेषक व्यक्त करीत आहेत. या अस्थैर्याचा लाभ घेण्याची तयारी तेहरिकने केल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. यामुळे एकाच वेळी पाकिस्तानला राजकीय अस्थैर्याबरोबर सुरक्षेच्या आघाडीवरील या आव्हानाचाही सामना करावा लागेल. मुख्य म्हणजे तसे करण्याची क्षमता या देशाकडे उरलेली नाही, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.