पंतप्रधान मोदी यांची इस्रायलच्या पंतप्रधानांशी चर्चा

नवी दिल्ली – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी आपली फोनवरून चर्चा पार पडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. सोशल मीडियावर ही माहिती देताना, पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली पंतप्रधानांशी सध्या जगभरात सुरू असलेल्या घडामोडींवर आपले बोलणे झाल्याचे म्हटले आहे. युक्रेनमधील युद्ध, अमेरिकेचा इराणबरोबरील अणुकरार व त्यावर अरब-आखाती देशांनी इस्रायलबरोबर सुरू केलेल्या सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी व पंतप्रधान बेनेट यांच्यातील ही चर्चा लक्षवेधी ठरते आहे.

इस्रायलच्या पंतप्रधानांशीइस्रायलचे पंतप्रधान ३ एप्रिल रोजी भारताच्या भेटीवर येणार होते. पण त्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा दौरा पुढे ढकलण्या आला. त्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली पंतप्रधानांची विचारपूस केली. यावेळी दोन्ही नेत्यांची आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती इस्रायली पंतप्रधानांच्या माध्यमविषयक सल्लागारांनी दिली. यामध्ये जागतिक तसेच क्षेत्रिय मुद्यांसह यात इराणच्या अणुकार्यक्रमाचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या आठवड्यात इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची पंतप्रधान मोदी यांनी निर्भत्सना केली होती. त्यासाठी इस्रायली पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

युक्रेनचे युद्ध सुरू असतानाच, आखाती क्षेत्रातही फार मोठ्या घडामोडी होत आहेत. अमेरिका इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याच्या तयारीत असता इस्रायलसह आखाती देशांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इस्रायलने नुकतीच नेगेव्ह परिषद आयोजित केली होती व त्यात युएई, बाहरिन, मोरोक्को व इजिप्त हे देश सहभागी झाले होते. या देशांमध्ये उघडपणे लष्करी सहकार्यावर चर्चा पार पडली. अमेरिकेची पर्वा न करता इराणविरोधीत उभी राहत असलेल्या या लष्करी आघाडीचा पुढच्या काळात अधिकच विस्तार होईल व त्यात सौदी अरेबिया आणि इतर आखाती देश सहभागी होतील, अशी चर्चा आहे. याची दखल अमेरिकेला घ्यावी लागल्याचे दावे केले जातात.

अशा परिस्थितीत भारत व इस्रायलच्या पंतप्रधानांमध्ये पार पडलेली चर्चा लक्षवेधी ठरते. लवकरच इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येणार असून दोन्ही देशांमधील या सहकार्याचे व्यापक परिणाम संभवतात, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. भारत व इस्रायलमधील मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू असून जून महिन्यापर्यंत हा करार संपन्न होईल, असे सांगितले जाते.

leave a reply