तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका चीनवर कठोर निर्बंध लादेल

- अर्थमंत्री जॅनेट येलन

निर्बंध लादेलवॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग – ‘आक्रमकता दाखविणार्‍या देशांना जबर फटका बसेल, असे निर्बंध अमेरिका लादू शकते. रशियाविरोधात लादलेल्या निर्बंधांनी ही बाब दाखवून दिली आहे. इतर देशांबाबत अशी स्थिती निर्माण झाल्यास अमेरिका निर्बंधांचा वापर करील. यावर संसद सदस्यांनी शंका घेण्याची गरज नाही’, अशा शब्दात अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलन यांनी अमेरिका तैवानच्या मुद्यावरून चीनविरोधातही निर्बंध लादेल, असा इशारा दिला.

युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्याचे संकेत दिले आहेत. यात आर्थिक, व्यापारी, राजनैतिक तसेच संरक्षणविषयक सहकार्याचा समावेश आहे. अमेरिकेच्या दोन शिष्टमंडळांनी तैवानचा दौरा केला असून आर्थिक तसेच लष्करी सहकार्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार करण्यात येणार्‍या ‘इंडो-पॅसिफिक आर्थिक करारा’त तैवानचा समावेश करावा, अशी मागणी अमेरिकेच्या संसद सदस्यांनी नुकतीच केली आहे.

निर्बंध लादेलदोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानबरोबरील ‘पॅट्रिऑट मिसाईल्स’च्या कराराला मंजुरी दिल्याचेही जाहीर केले होते. त्यापाठोपाठ अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी तैवानला भेट देणार असल्याचे वृत्त आले आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकी संसदेतील रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य पॅट्रिक मॅक्हेन्री यांनी चीनसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने जसे निर्बंध लादले, तसेच निर्बंध अमेरिका चीनने तैवानवर हल्ला केला तर लादेल का असा सवाल मॅक्हेन्री यांनी केला होता. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री येलन यांनी चीनलाही निर्बंधांचे लक्ष्य करण्यात येईल, असे बजावले.

रशियाने युक्रेनवर चढविलेला हल्ला रोखण्यात अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देश अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अशा हल्ल्याची पुनरावृत्ती तैवानच्या बाबतीत झाल्यास अमेरिका व मित्रदेशांची भूमिका काय असेल, याबाबत माध्यमे व सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे सारे लक्ष युक्रेनमधील युद्धाकडे केंद्रीत झालेले असताना, याचा फायदा घेऊन चीन तैवानवर आक्रमण करील, असा इशारा काही विश्‍लेषक देत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिका चीनचे काहीही करू शकणार नाही, अशी चिंता या विश्‍लेषकांनी व्यक्त केली होती. तैवानवर हल्ला चढविणार्‍या चीनवर रशियाप्रमाणे निर्बंध लादताना अमेरिका कचरणार नाही, असे येलेन सांगत आहेत खर्‍या. मात्र रशियावरील निर्बंधांमुळे युक्रेनचे संरक्षण झालेले नाही. त्यामुळे अमेरिकेने चीनवर कितीही कडक निर्बंध लादले तरी त्याने तैवानचा बचाव होऊ शकणार नाही. पण बायडेन यांचे प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तैवानबाबत धरसोडीचे धोरण स्वीकारत आहे. ही बाब चीनच्या पथ्यावर पडणारी ठरते. जपानचे माजी पंतप्रधान ऍबे शिंजो यांनी हा मुद्दा उपस्थित करून बायडेन प्रशासनावर खरमरीत टीका केली होती.

leave a reply