पॅरिस – रशिया व युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धावरुन फ्रान्स आणि पोलंड या युरोपिय देशांमध्येच वाद पेटला आहे. पोलंडचे पंतप्रधान मॅथ्युझ मोराविस्की हे कडवे ज्यूविरोधी असल्याचा आरोप फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केला. यावर संतापलेल्या पोलंडने फ्रान्सच्या राजदूतांना समन्स बजावले. यामुळे युक्रेनमधील युद्धाबाबत युरोपिय देशांमध्ये एकवाक्यता नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
‘नाझी जर्मनीचा हुकूमशहा हिटलर किंवा सोव्हिएत रशियाचे राष्ट्रप्रमुख जोसेफ स्टॅलिन या युद्धगुन्हेगारांसोबत कधीही चर्चा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे युक्रेनवर हल्ले चढविणार्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबरही चर्चा शक्य नाही’, अशी टीका पोलंडचे पंतप्रधान मॅथ्युझ मोराविस्की यांनी केली होती.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पोलीश पंतप्रधानांच्या या विधानावर आक्षेप घेतला. तसेच पोलंडचे पंतप्रधान हे कडवे ज्यूविरोधी असल्याचा ठपका फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यावर टीका करणारे पोलंडचे पंतप्रधान स्वत: फ्रान्समधील आगामी निवडणुकीत ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केला.