श्रीलंकेवर कोसळलेल्या संकटाला सरकार जबाबदार

- माजी पंतप्रधान विक्रमसिंघे यांचा आरोप

कोलंबो – टंचाई, महागाईसोबत राजकीय अस्थैर्य थैमान घालत असलेल्या श्रीलंकेच्या आजच्या अवस्थेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षाचे नेते करीत आहेत. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सरकारने अर्थव्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने हातळल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा ठपका ठेवला. यापुढे श्रीलंकेला चीनच्या गुंतवणुकीची गरज नाही, भारत श्रीलंकेला सहाय्य करील, असे सूचक उद्गार काढून विक्रमसिंघे यांनी आपल्या देशाच्या दूरावस्थेला चीन जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला.

सरकार जबाबदारगेल्या काही आठवड्यांपासून श्रीलंकेत वीज नाही. गॅस, अन्नधान्य आणि इतर अत्यावश्यक गोष्टींचा या देशात भयंकर तुडवडा जाणवत आहे. श्रीलंकेत औषधांचीही टंचाई भासू लागली आहे. तसेच या देशावरील इंधनसंकट दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. १९४८ साली श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या काळात या देशावर आलेले हे सर्वात मोठे संकट असल्याचा दावा केला जातो.

याविरोधात श्रीलंकन जनता रस्त्यावर उतरली असून सरकारविरोधात निदर्शने अधिकाधिक तीव्र बनली आहेत. दहा हजारांहून अधिक संख्येने निदर्शनकर्ते श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर घोषणा देत आहेत. राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर पकडत आहे. माजी पंतप्रधान विक्रम रानिलसिंघे यांनी देशाच्या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करुन त्यासाठी सरकारला जबाबदार धरले. श्रीलंकेतील आर्थिक संकट आता राजकीय संकटाच्या दिशेने जात आहे. देशासाठी ही फार मोठी आपत्ती ठरणार असल्याची भिती विक्रमसिंघे यांनी व्यक्त केली.

सरकार जबाबदारगेल्या दोन वर्षांपासून राजपक्षे यांनी या आर्थिक संकटाकडे दुर्लक्ष केले. सेंट्रल बँकेच्या सल्ल्यानुसार आधीच हे सरकार आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे गेले असते, तर आज जनतेला याची भयंकर किंमत चुकती करावी लागली नसती, असा ठपका विक्रमसिंघे यांनी ठेवला. या संकटाच्या काळात भारत श्रीलंकेला करीत असलेले सहाय्य अंत्यत महत्त्वाचे ठरते, असे सांगून विक्रमसिंघे यांनी भारताचे आभार मानले आहेत.

दरम्यान, भारताने श्रीलंकेला इंधनाचा पुरवठा सुरु केला आहे. भारताकडून श्रीलंकेला अन्नधान्य आणि भाज्यांसह इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. याबरोबरच भारत श्रीलंकेला कर्जसहाय्य पुरवून या देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रयत्न करीत आहे. श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूंनी यासाठी भारताचे आभार मानले आहेत.

कोरोनाची साथ, युक्रेनचे युद्ध यामुळे खडे ठाकलेले आर्थिक व इंधनविषयक संकट ही श्रीलंकेच्या दूरावस्थेची प्रमुख कारणे मानली जातात. मात्र चीनकडून चढ्या व्याजदराने घेतलेल्या कर्जाचा फास ही श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची मूळ समस्या असल्याची टीका अर्थतज्ज्ञ करीत आहे. विचार न करता चीनच्या कर्जाच्या फासात श्रीलंकेला अडकविण्यात आले व त्याला राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षासह राजकारणाशी संबंध नसलेले श्रीलंकेतील मान्यवर करीत आहेत.

leave a reply