इराण आपल्या अणुकार्यक्रमापासून तसूभरही माघार घेणार नाही

- राष्ट्राध्यक्ष रईसी यांची घोषणा

तेहरान – इराणबरोबर अणुकरार करून या देशाला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखता येईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व त्यांच्या सहकार्‍यांचे म्हणणे आहे. पण त्यांच्या डेमोक्रॅट पक्षाचे लोकप्रतिनिधीच इराणबरोबरील अणुकराराच्या विरोधात आक्रमक बनले आहेत. अशा परिस्थितीत इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांनी इराण आपल्या अणुकार्यक्रमातून तसूभरही माघार घेणार नाही, अशी डरकाळी फोडली. इराणमध्ये साजर्‍या केल्या जाणार्‍या राष्ट्रीय आण्विक दिनाचे औचित्य साधून त्यांनी हा इशारा दिला.

माघार घेणार नाहीऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथे अमेरिका आणि प्रमुख युरोपिय देशांच्या इराणशी अणुकरारावर वाटाघाटी सुरू आहेत. २०१५ सालचा हा अणुकरार नव्याने करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न लवकरच यशस्वी ठरतील, असा दावा इराण तसेच अमेरिका व युरोपिय देशांनीही केला होता. पण आता मात्र परिस्थिती बदलत असल्याचे दिसते. अमेरिकेच्या सत्ताधारी पक्षाचे लोकप्रनिधी या अणुकराराच्या विरोधात गेले आहेत. अणुकरारानंतरही इराण आपला आण्विक कार्यक्रम पुढे रेटणार असेल, तर मग या कराराची गरजच काय? असे या अमेरिकी लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

इराणच्या अणुकार्यक्रमावर हा आक्षेप घेतला जात असतानाच, इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी आपल्या देशाची भूमिका ठाम शब्दात मांडली. अणुकरारावर वाटाघाटी सुरू झाल्यापासून तेहरानमधून व्हिएन्नापर्यंत शेकडो वेळा संदेश पोहोचविण्यात आला आहे. काहीही झाले तरी इराण आपला अणुकार्यक्रम तसूभरही मागे घेणार नाही आणि याबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड संभवतच नाही, असे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी स्पष्ट केले. अणुकार्यक्रम हा इराणचा अधिकार आहे. हा अधिकार आम्ही कुठल्याही परिस्थिती सोडून देणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ठणकावले.

माघार घेणार नाहीयाआधीही इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत तडजोड शक्य नसल्याचे घोषित केले होते. तरीही व्हिएन्ना येथील चर्चेतून यावर मार्ग निघाल्याचे संकेत बायडेन प्रशासनाकडून दिले जात होते. इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या अगदी समीप असल्याचा आरोप इस्रायल सातत्याने करीत आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही व त्यासाठी इस्रायल कुठलीही किंमत मोजायला तयार आहे, असे इस्रायलने वारंवार बजावले होेते.

अमेरिकेनेही इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देता येणार नाही, हे इस्रायलचे म्हणणे मान्य केले. मात्र नुकतीच इस्रायलला भेट देणार्‍या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला अणुबॉम्ब मिळू नये, यासाठीच अणुकरार आवश्यक असल्याचा दावा केला होता. पण इस्रायलने हा तर्क धुडकावून लावला आहे. इस्रायलच नाही तर सौदी व युएई हे आखाती देश देखील इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिकेने स्वीकारलेल्या भूमिकेवर असंतोष व्यक्त करीत आहेत.

अशा परिस्थितीत इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी अणुकार्यक्रमाबाबत केलेली विधाने इराणबरोबरील नव्या अणुकराराचे भवितव्य धोक्यात टाकू शकतात. यामुळे अमेरिकेतूनच या कराराला असलेल्या विरोधाची धार अधिकच वाढू शकते.

leave a reply