रशियन इंधनाला पर्याय देता येणार नाही

- ओपेकची ठाम भूमिका

इंधनाला पर्यायव्हिएन्ना – सध्या इंधन बाजारपेठेत होणारे चढउतार ही ‘ओपेक’ संघटनेच्या नियंत्रणापलिकडील बाब आहे, असा दावा करून रशियन इंधनाला पर्याय देता येणार नाही अशी ठाम भूमिका ओपेकने घेतली आहे. रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिदिन सुमारे ७० लाख बॅरल्स कच्च्या तेलाचा तुटवडा असल्याची माहितीही ओपेकने दिली. हा तुटवडा व भविष्यात रशियावर लादण्यात येणारे निर्बंध यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ऐतिहासिक ‘ऑईल सप्लाय शॉक’ बसलेला दिसेल, असा इशाराही इंधन उत्पादक देशांच्या संघटनेने दिला आहे.

इंधनाला पर्याययुक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व ब्रिटनसह काही देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादले आहेत. मात्र युरोपिय देश असे निर्बंध लादण्यात अपयशी ठरले आहेत. रशियाकडून युरोपच्या गरजेपैकी जवळपास ४० टक्के इंधन पुरविले जाते. यावर निर्बंध लादल्यास युरोपिय अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसू शकतो. त्यामुळे युरोपिय देश असा निर्णय घेण्यास कचरत आहेत. मात्र त्याचवेळी रशियन इंधनाची आयात कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. ओपेक संघटनेचे सदस्य असणार्‍या देशांना इंधनाचे उत्पादन वाढविण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र ओपेकने त्याकडे दुर्लक्ष केले असून रशियाचे समर्थन करणारी भूमिका घेतली आहे.

इंधनाला पर्यायसोमवारी युरोपिय महासंघाने ओपेकबरोबर विशेष बैठक आयोजित केली होती. युरोपचा इंधनपुरवठा वाढविण्याबाबत ओपेकने सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीतही ओपेक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले. ‘रशियावर सध्या टाकलेले निर्बंध व भविष्यातील कारवाई या पार्श्‍वभूमीवर प्रतिदिन ७० लाख बॅरल्सचे रशियन इंधन बाजारपेठेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्याची इंधन बाजारपेठेतील मागणी पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यायी इंधन उपलब्ध करून देणे जवळपास अशक्य आहे’, असे ओपेकचे महासचिव मोहम्मद बर्किंदो यांनी स्पष्ट केले.

रशियन इंधनवरील संभाव्य निर्बंधांची शक्यता व ओपेकने पुरवठ्या बाबत घेतलेली भूमिका या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली. गेल्या आठवड्यात १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली आलेले कच्च्या तेलाचे दर मंगळवारी १०२ डॉलर्स प्रति बॅरलवर गेले. नजिकच्या काळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपासच राहतील, असे भाकित विश्‍लेषकांनी वर्तविले आहे. दरम्यान, रशियावरील इंधन अवलंबित्व कमी करण्यासाठी इटलीने अल्जेरिआबरोबर इंधन करार केला आहे. करारानुसार अल्जेरियाकडून इटलीला करण्यात येणार्‍या इंधनपुरवठ्यात नऊ अब्ज घनमीटर इंधनवायुची भर टाकण्यात येणार आहे. सध्या अल्जेरियाकडून इटलीला २२ अब्ज घनमीटर इंधनवायू पुरविण्यात येतो. रशियापाठोपाठ अल्जेरिया हा इटलीला इंधनपुरवठा करणारा दुसरा मोठा निर्यातदार देश आहे. इटलीने केलेल्या कराराचे अनुकरण युरोपातील इतर देश करतील, असा दावा इटलीचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांनी केला आहे.

leave a reply