न्यूयॉर्क – मंगळवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ‘सबवे’मध्ये झालेल्या गोळीबारात २९ जण जखमी झाले. फ्रँक आर. जेम्स या संशयिताने हा हल्ला केल्याचा दावा न्यूयॉर्क पोलीस यंत्रणांनी केला. या घटनेला जवळपास २४ तास उलटले तरी संशयित फ्रँक अजूनही फरार आहे. त्यासाठी न्यूयॉर्क पोलीस तसेच स्थानिक प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.
न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध ब्रुकलिन भागात भुयारी रेल्वेमार्गात मंगळवारी सकाळी भीषण हल्ला झाला. मेट्रो ट्रेन ब्रुकलिन रेल्वेस्थानकात दाखल होताच, यामध्ये स्वार असलेल्या प्रवाशांवर फ्रँकने गोळीबार सुरू केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रँकने सुरुवातीला अश्रुधूराचा वापर केला व त्यानंतर सहप्रवाशांवर बेछूट गोळीबार केला. सदर ट्रेन व रेल्वेस्थानकातील किमान १० प्रवासी यात जखमी झाले. यामुळे झालेल्या धावपळीत १९ जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर न्यूयॉर्क पोलिसांनी शहरातील सर्वच सबवे स्थानकांवर अलर्ट जारी केला. तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविल्याचे जाहीर केले. पण अजूनही न्यूयॉर्क पोलिसांना फ्रँकला शोधण्यात यश मिळालेले नाही. फ्रँकने केलेल्या या हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण फ्रँक याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन वेगवेगळे दावे केले जात आहेत.
फ्रँक हा वंशद्वेषी आणि न्यूयॉर्क पोलीस दलाचा विरोधक असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर न्यूयॉर्क प्रशासन आणि युक्रेन युद्धाचा टीकाकार असल्याचे फ्रँकच्या अकाऊंटवरुन उघड झाले आहे. फ्रँकची माहिती देण्यासाठी न्यूयॉर्क पोलिसांनी ५० हजार डॉलर्सचे ईनाम जाहीर केले आहे.