अमेरिकेचे दडपण झुगारून भारत रशियाबरोबरील व्यापार वाढविणार

रशियाबरोबरील व्यापारनवी दिल्ली – भारताने रशियाबरोबरील सहकार्य कायम ठेवले, तर त्याची गंभीर किंमत चुकती करावी लागेल, अशा धमक्या व इशारे अमेरिका वेगवेगळ्या मार्गाने देत आहे. दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या टू प्लस टू चर्चेतही अमेरिकेने भारताला याची जाणीव करून दिली होती. मात्र अमेरिकेच्या दडपणाचा आपल्यावर परिणाम होणार नाही, असा संदेश भारताकडून दिला जात आहे. अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादलेले असतानाच, भारत रशियामध्ये आणखी दोन अब्ज डॉलर्सची निर्यात वाढविण्याची तयारी करीत आहे.

अमेरिका व युरोपिय देशांनी कठोर निर्बंध लादल्याने याचा फार मोठा फटका रशियन अर्थव्यवस्थेला बसतो आहे. अनेक उत्पादनांसाठी रशिया युरोपिय देशांच्या निर्यातीवर अवलंबून होता. निर्बंधांमुळे ही निर्यात थांबणार आहे. अशा परिस्थितीत रशियाचा निकटतम मित्रदेश असलेल्या भारताच्या उद्योगक्षेत्रासाठी फार मोठी संधी चालू आली आहे. रशियन नेते याकडे लक्ष वेधत आहेत. यामुळे भारताच्या औषधनिर्मिती, रसायने, कृषी उत्पादने, चहा-कॉफी व दुग्धव्यवसाय, वस्त्रोद्योगाची रशियामधील निर्यात प्रचंड प्रमाणात वाढू शकते. यासाठी भारताने रशियाशी चर्चा सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

एकीकडे अमेरिका भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करू नये, यासाठी अमेरिका दडपण टाकत आहे. रशियाकडून इंधन खरेदी करणे भारताच्या हिताचे ठरणार नाही, असा धमकीवजा इशारा अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला होता. तर भागीदार म्हणून अमेरिका उपलब्ध नसताना, भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी केली, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. अमेरिका भारताला शस्त्रास्त्रे व इतर सहकार्य पुरविण्यास तयार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. भारताने अमेरिकेसाठी रशियाबरोबरील सहकार्य मोडीत काढावे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रा याद्वारे भारताला सुचवित आहेत.

मात्र भारताने रशियाबाबतचे आपले पारंपरिक धोरण बदलण्यास स्पष्टपणे नकार दिला. केवळ इंधनाच्या क्षेत्रातच नाही, इतर आघाड्यांवरील रशियाबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी भारत उत्सूक आहे, याची जाणीव अमेरिकेला करून दिली जात आहे. रशियाने भारतीय उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ अधिक खुली करावी, असे आवाहन भारताचे सरकार करीत आहे. इतकेच नाही तर रशियात निर्यात करण्यासाठी भारताने २० उत्पादनांची यादी तयार केल्याची माहिती पाश्‍चिमात्य माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने देत आहेत.

उत्तम संबंध असले तरी भारत व रशियाचा व्यापार अपेक्षित उंची गाठू शकलेला नाही. सध्या भारत रशियाला वर्षाकाठी सुमारे तीन अब्ज डॉलर्सची निर्यात करीत आहे. तर भारतातून अमेरिकेला केली जाणारी निर्यात ६८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. असे असले तरी भारत अमेरिकेसाठी रशियाबरोबरील आपले सहकार्य पणाला लावण्यास तयार नाही. उलट अमेरिकेची नाराजी व निर्बंधांचा धोका पत्करूनही भारत रशियाबरोबरील संबंध विकसित करणार असल्याचे दिसत आहे.

leave a reply