हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलचे प्रत्युत्तर

- हमासकडून पहिल्यांदाच विमानभेदी क्षेपणास्त्रांचा वापर

विमानभेदी क्षेपणास्त्रांचा वापरगाझा/जेरुसलेम – गाझापट्टीतील हमासने सोमवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलवर रॉकेट हल्ला चढविला. प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासची महत्त्वाची ठिकाणे आणि शस्त्रास्त्रांची कोठारे नष्ट केली. चार महिन्यानंतर हमासने पहिल्यांदाच इस्रायलवर रॉकेट हल्ला चढविल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर इस्रायलच्या हवाई हल्ल्याविरोधात हमासने विमानभेदी क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इस्रायलशी सलग सहा महिन्यांपर्यंत युद्ध करण्यासाठी आपली तयारी असल्याचा इशारा, हमासने गेल्याच आठवड्यात दिला होता.

हमासच्या दहशतवाद्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलवर रॉकेट हल्ला चढविला. पण इस्रायलच्या आयर्न डोम या हवाई सुरक्षा यंत्रणेने तो यशस्वीरीत्या भेदला. यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझाच्या खान युनूस आणि इतर महत्त्वाच्या शहरांना हवाई हल्ल्यात लक्ष्य केले. या कारवाईत हमासचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचबरोबर हमासकडे विमानभेदी क्षेपणास्त्र यंत्रणा असल्याची माहिती उघड झाली आहे. हमासने आपल्या विमानाविरोधात या यंत्रणेचा वापर केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली.

विमानभेदी क्षेपणास्त्रांचा वापरहमासचा प्रवक्ता कासेम याने इस्रायलवर चढविलेल्या हल्ल्याचे समर्थन केले. तसेच यापुढे इस्रायलची लढाऊ विमाने हमासच्या विमानभेदी क्षेपणास्त्रांच्या निशाण्यावर असतील, अशी धमकी हमासच्या प्रवक्त्याने दिली. हमासने इस्रायली विमानांवर हल्ल्यासाठी एसए-७ स्ट्रेला या क्षेपणास्त्राचा वापर केला, अशी माहिती अल मयादिन या हिजबुल्लाहसंलग्न वृत्तवाहिनीने दिली. या हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पण हमासचे हल्ले आणि त्यामध्ये विमानभेदी क्षेपणास्त्राचा केलेला वापर, ही चिंतेची बाब ठरते, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच इस्रायलविरोधी युद्धाची पूर्ण तयारी केल्याची घोषणा करून सलग सहा महिने युद्ध सुरू ठेवण्यासाठी सज्ज असल्याचे हमासने धमकावले होते. गेल्या वर्षीच्या संघर्षात हमासने इस्रायलवर तब्बल ४,३६० रॉकेट्सचा मारा केला होता. त्यानंतरच्या काळात हमासच्या शस्त्रसाठ्यामध्ये बरीच वाढ झाल्याचा इशारा इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी दिला होता. विमानभेदी क्षेपणास्त्रांचा वापर करून हमासने पुन्हा एकदा आपली तयारीची झलक इस्रायलला दाखविल्याचे दिसत आहे.

leave a reply