क्रिप्टोकरन्सी नियंत्रित ठेवणे आवश्‍यक बनले आहे

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामनवॉशिंग्टन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तलिना जॉर्जिवा यांच्याशी चर्चा पार पडली. कोरोनाची साथ व त्यानंतर युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चितेच्या काळातही चांगली कामगिरी करीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची यावेळी नाणेनिधीच्या प्रमुखांनी प्रशंसा केली. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाणेनिधीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलताना क्रिप्टोकरन्सीपासून संभवणाऱ्या धोक्यांची जाणीव करून दिली. क्रिप्टोकरन्सीमुळे निधीचे अवैध हस्तांतरण आणि दहशतवादी कारवायांना पैसे पुरविले जातात, याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधले.

गेल्या काही महिन्यांपासून भारताने क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर ठाम भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या ‘सिडनी डायलॉग`ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीपासून लोकशाहीवादी देशांना असलेल्या धोक्याचा इशारा दिला होता. त्याच धर्तीवर नाणेनिधीने आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सी नियंत्रित करण्याची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट केले. एका देशाची मध्यवर्ती बँक दुसऱ्या देशाच्या मध्यवर्ती बँकेसोबत आपल्या चलनामध्ये व्यवहार करीत असेल, तर ती स्वागतार्ह बाब ठरते. पण कुणाचे नियंत्रण आहे, तेच ठाऊक नसलेल्या क्रिप्टोकरन्सीचा व्यवहारांसाठी होत असलेला वापर ही घातक बाब आहे. याद्वारे मनी लाँडरिंग अर्थात निधीचे अवैध हस्तांतरण व दहशतवाद्यांना पैसे पुरविण्यासारख्या गुन्ह्यांचा धोका वाढला आहे, असे सीतारामन पुढे म्हणाल्या.

याबरोबरच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांची व्याप्ती लक्षात घेता, एक देश यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यासाठी सर्वच देशांचे सहकार्य आवश्‍यक असल्याचे सीतारामन यांनी लक्षात आणून दिले आहे. दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या या अमेरिका दौऱ्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना जॉर्जिवा यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत जॉर्जिवा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. विकसनशील देशांमध्ये भारत सर्वाधिक वेगाने प्रगती करणार असल्याचे भाकित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकतेच वर्तविले होते. तसेच भारताने कोरोनाच्या लसीकरणासाठी राबविलेल्या मोहिमेचेही जॉर्जिवा यांनी कौतूक केले आहे.

श्रीलंकेसारख्या देशाला संकटाच्या काळात भारत करीत असलेल्या भरीव सहाय्याचीही दखल जॉर्जिवा यांनी घेतली. यावेळी अर्थमंत्री सीतारामन व जॉर्जिवा यांच्यात भू-राजकीय घडामोडींवरही चर्चा पार पडली. युक्रेनच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अर्थमंत्री सीतारामन व नाणेनिधीच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे इंधनाचे दर कडाडले असून त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर विघातक परिणाम होत आहेत, याचीही नोंद सदर चर्चेत घेण्यात आली.

leave a reply