चीन व सॉलोमन आयलंडदरम्यान सुरक्षा करारावर स्वाक्षऱ्या

- चीनच्या प्रवक्त्यांची माहिती

बीजिंग – पॅसिफिक महासागर क्षेत्रातील सॉलोमन आयलंड या देशाबरोबर सुरक्षा करार केल्याची माहिती चीनने दिली. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनी चीन व सॉलोमन आयलंडमधील संभाव्य सहकार्यावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी या देशाला भेट देऊन चीनबरोबरचा करार नाकारण्याचे आवाहन केले होते. चीनकडून कराराची घोषणा होत असतानाच अमेरिकेचे दोन वरिष्ठ अधिकारी सॉलोमन आयलंडमध्ये दाखल झाल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

चीन व सॉलोमनगेल्या काही वर्षात चीन ‘इंडो-पॅसिफिक`सह संपूर्ण पॅसिफिक महासागरात आपला प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे. त्यासाठी चीनने आपल्या आर्थिक बळाचा वापर सुरू केला होता. पॅसिफिक क्षेत्रातील आठ ‘आयलंड नेशन्स`ना जवळपास दोन अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य व कर्ज दिल्याचे विविध अहवालांमधून समोर आले होते. दोन वर्षांपूर्वी चीनच्या राजवटीने ‘सॉलोमन आयलंड`मधील सरकारला तैवानबरोबरील राजनैतिक संबंध तोडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ‘सॉलोमन आयलंड`चा भाग असणाऱ्या ‘तुलागी आयलंड`वर चिनी कंपनीने ताबा मिळविला होता.

आता चीनकडून सॉलोमन आयलंडवर संरक्षणतळ उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चीनच्या प्रवक्त्यांकडून सुरक्षा कराराबद्दल देण्यात आलेली माहिती त्याचाच भाग ठरतो. चीनचा दूतावास तसेच सॉलोमन आयलंडमधील सरकारी सूत्रांनी सदर करार देशातील चिनी उपक्रमांच्या सुरक्षेसाठी असल्याचे म्हटले आहे. सॉलोमन आयलंडवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चीन या देशाला सहकार्य करेल, असेही सांगण्यात आले आहे. मात्र अमेरिका व ऑस्ट्रेलियाने चीन सॉलोमन आयलंडवर संरक्षणतळ उभारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दावे केले आहेत.

चीन व सॉलोमनऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय आणि पॅसिफिक व्यवहार विभागाचे मंत्री झेड सेसेला यांनी गेल्या आठवड्यात सॉलोमन आयलंडला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी, ऑस्ट्रेलिया आणि सॉलोमन आयलंडमधील सहकार्याची आठवण करून दिली. यावर्षीच ऑस्ट्रेलियाने सॉलोमन आयलंडला जवळपास 12 कोटी डॉलर्सचे सहाय्य पुरविले होते, याकडेही सेसेला यांनी लक्ष वेधले होते. ऑस्ट्रेलिया हा सॉलोमन आयलंडचा सुरक्षेच्या आघाडीवरील महत्त्वाचा सहकारी देश असल्याची जाणीवही ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी करून दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत सॉलोमन आयलंडने चीनबरोबरील करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे आपल्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील वरिष्ठ अधिकारी कर्ट कॅम्पबेल तसेच परराष्ट्र विभागाचे अधिकारी डॅनिअल क्रिटनब्रिंक यांना सॉलोमन आयलंडच्या दौऱ्यावर पाठविल्याचे वृत्त आहे. हे अधिकारी फिजी व पापुआ न्यू गिनीलाही भेट देणार असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply