रशियाच्या विरोधात जाण्यासाठी पाश्‍चिमात्य भारतावरील दडपण वाढवतील

- चीनच्या मुखपत्राचा दावा

बीजिंग – ज्या प्रमाणात भारताचा जागतिक पातळीवर उदय होत आहे, त्याच प्रमाणात पाश्‍चिमात्य देश भारतावर दडपण वाढविण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. युक्रेनच्या युद्धात भारताने रशियाच्या विरोधात जावे, यासाठी पाश्‍चिमात्य देश भारतावर टाकत असलेले दडपण हेच दाखवून देते, असे चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीय लेखात म्हटले आहे. त्याचवेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व युरोपिय कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोन देर लेन दबाव टाकण्यासाठीच भारतात येत असल्याचा दावा चिनी विश्‍लेषक करीत आहेत.

रशियाच्या विरोधातयुक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाच्या विरोधात जाण्याचे टाळले आहे. रशियाचा निकटतम सहकारी देश असलेल्या चीनला देखील या आघाडीवर भारताइतकी ठाम भूमिका स्वीकारता आलेली नाही. चीनच्या कंपन्या रशियाबरोबर सहकार्य करण्याचे टाळू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची प्रशंसा करणे चीनला भाग पडले आहे. कायम भारतविरोधी भूमिका स्वीकारणार्‍या चीनच्या सरकारी मुखपत्रांनीही यासाठी भारताला दाद द्यावी लागली होती.

मात्र पुढच्या काळात पाश्‍चिमात्य देश भारतावर रशियाच्या विरोधात जाण्यासाठी अधिक जोर लावतील. भारत व आपल्या देशाचे हितसंबंध समान असल्याचे दावे या देशांकडून करण्यात येतील. पण प्रत्यक्षात पाश्‍चिमात्य देश केवळ आपल्याच हितसंबंधांवर लक्ष केंद्रीत करतील, याचा अनुभव भारत लवकरच घेईल, असा दावा ग्लोबल टाईम्सने आपल्या या संपादकीय लेखात केला. यासाठी चिनी अभ्यासगटांच्या विश्‍लेषकांचाही आधार घेण्यात आला आहे.

leave a reply