अमेरिकन डॉलर, युरोचे महत्त्व कमी करून इस्रायलने परकीय गंगाजळीत चीनच्या युआनला जागा दिली

तेल अविव – 2021 सालापर्यंत इस्रायलच्या परकीय गंगाजळीत फक्त अमेरिकन डॉलर्स, युरो आणि ब्रिटिश पौंड यांनाच स्थान होते. पण चालू वित्तीय वर्षात इस्रायलच्या सेंट्रल बँकेने परकीय गंगाजळीतील अमेरिकन डॉलर आणि युरोवरील अवलंबित्व कमी करून चीनचे युआन, कॅनडा व ऑस्ट्रेलियन डॉलरआणि जपानच्या येनचा साठा करण्याचे निश्‍चित केले आहे. सध्याच्या भूराजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर इस्रायलच्या सेंट्रल बँकेने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

इस्रायलची परकीय गंगाजळी पहिल्यांदाच 200 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामध्ये आत्तापर्यंत अमेरिकन डॉलर्सचे प्रमाण 65 टक्के तर युरोचा साठा 30 टक्के इतका होता. इस्रायलच्या परकीय गंगाजळीतील ब्रिटिश पौंडचे प्रमाण जवळपास पाच टक्के इतके होते. पण येत्या काळात परकीय गंगाजळीवर निश्‍चित परतावा मिळविण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगून इस्रायलच्या सेंट्रल बँकेने इतर देशांच्या चलनातील राखीव वाढविण्याचे जाहीर केले.

यानुसार इस्रायलच्या परकीय गंगाजळीतल अमेरिकन डॉलर तसेच युरोची टक्केवारी कमी करण्यात येईल. डॉलर 65 टक्क्यावरुन थेट 61 टक्क्यांवर आणले जाईल. तर युरोचे प्रमाण 30 वरुन 20 टक्क्यांवर येईल, असे इस्रायलच्या सेंट्रल बँकेने स्पष्ट केले. यातुलनेत ब्रिटिश पौंडच्या टक्केवारीत वाढ होईल. ऑस्ट्रेलियन आणि कॅनेडियन डॉलर्सना प्रत्येकी साडे तीन टक्केची जागा मिळेल. तर इस्रायलच्या परकीय गंगाजळीत चीनच्या युआनला दोन टक्के इतकेच स्थान मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अमेरिकन डॉलरच्या मुल्यात होत असलेल्या घसरणीवर चिंता व्यक्त केली होती. गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच अमेरिकन डॉलरच्या मुल्यात एवढी घसरण पहायला मिळाल्याची नोंद नाणेनिधीने केली होती. तर डॉलरच्या या अवमुल्यनाचा फायदा चीन घेत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिला होता. सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदाही चीनला मिळत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply