नवी दिल्ली – भारतीय लष्कराने देशाच्या सुरक्षेला असलेल्या भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे. यामध्ये अपारंपरिक तसेच कुठलीही चौकट नसलेल्या युद्धाचाही समावेश आहे, असा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. भारतीय लष्कराच्या कमांडर्सच्या बैठकीत बोलताना संरक्षणमंत्र्यांनी हा संदेश देत असताना, लष्कराच्या सज्जतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
सोमवारपासून भारतीय लष्कराच्या कमांडर्सची द्वैवार्षिक परिषद सुरू झाली. याला संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी आत्तापर्यंत भारतीय लष्कराने प्राप्त केलेली क्षमता व सज्जतेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. या परिषदेत लष्करी अधिकाऱ्यांनी चीन व पाकिस्तानच्या सीमेलगत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच युक्रेनच्या युद्धानंतर बदललेल्या भू-राजकीय समीकरणांचीही नोंद या परिषदेत करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्र्यांनी भविष्यात देशाच्या सुरक्षेला संभवणारे धोके लक्षात घेऊन त्यासाठी लष्कराने सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. भविष्यातील युद्ध तसेच सुरक्षाविषयक आव्हाने पारंपरिक पातळीवर मर्यादित राहणार नाही. तर देशाला अपारंपरिक युद्धाचाही सामना करावा लागू शकतो, याची जाणीव संरक्षणमंत्र्यांनी करून दिली आहे. त्यासाठी सज्जतेचे आवाहन करून संरक्षणमंत्र्यांनी लष्कराने यासाठी क्षमता विकसित करावी, असे म्हटले आहे.