कोपनहेगन – युरोपातील ‘नॉर्डिक’ देशांबरोबरील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी भारत पावले उचलेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये दुसरी ‘इंडिया-नॉर्डिक समिट’ पार पडणार आहे. या परिषदेपूर्वी पंतप्रधानांनी चार नॉर्डिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय मुद्यावर चर्चा केली. या चर्चेत ‘ब्ल्यू वॉटर इकॉनॉमी’ अर्थात सागरी क्षेत्राशी निगडित अर्थकारण, अक्षय ऊर्जा, अंतराळक्षेत्र, मासेमारी यासारख्या मुद्यांचा समावेश होता.
बुधवारी होणाऱ्या ‘इंडिया-नॉर्डिक समिट’पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वे, आईसलँड, फिनलँड आणि स्वीडन या देशांच्या नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केली. यातील नॉर्वे, स्वीडन व फिनलंडच्या पंतप्रधानांची भेट घेण्याची भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच वेळ होती. ब्ल्यू वॉटर इकॉनॉमी अर्थात सागरी क्षेत्राशी निगडीत असलेले अर्थकारण, अंतराळ क्षेत्र व अक्षय ऊर्जा हे या देशांच्या पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेतील समान मुद्दे होते. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोर यांच्याबरोबरील पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेत आर्टिक्ट क्षेत्राबाबतच्या धोरणाचा समावेश होता.
नॉर्वे हा भारताने नुकत्याच घोषित केलेल्या आर्क्टिक क्षेत्राबाबतच्या धोरणाचा प्रमुख आधार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले. इंधनसंपन्न असलेल्या आर्क्टिक क्षेत्राकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. इथल्या इंधनचा लाभ मिळविण्यासाठी स्पर्धा पेट घेत आहे. भारताही आपण या स्पर्धेत मागे राहणार नाही, याची दक्षता घेत असून यासाठी नॉर्वे व इतर नॉर्डिक देशांबरोबरील सहकार्यात भारत जाणीवपूर्वक वाढ करीत आहे. म्हणूनच नॉर्वेचे पंतप्रधान स्टोर यांच्याबरोबरील पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेत आलेला आर्क्टिक धोरणाबाबतचा मुद्दा लक्षणीय ठरतो.
पंतप्रधान मोदी यांनी स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्दालेना अँडरसन यांच्याबरोबरील चर्चेत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय सहकार्यासाठी आखलेल्या जॉर्ईंट ॲक्शन प्लॅनचा आढावा घेतला. 2018 साली पंतप्रधान मोदी यांनी स्वीडनला भेट दिली होती. त्यावेळी दोन्ही देशांमधील जाईंट ॲक्शन प्लॅनची घोषणा झाली होती. यात संरक्षण, व्यापार, गुंतवणूक व ऊर्जा आणि विज्ञान व आरोग्यक्षेत्रातील सहकार्याचा समावेश होता. आईसलँड आणि फिनलँड या देशांच्या पंतप्रधानांबरोबरही पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय सहकार्य व्यापक करण्याबाबत चर्चा केली.