वित्त क्षेत्रातील जर्मन कंपन्यांना सायबरहल्ल्याचा मोठा धोका

- नियंत्रक संस्थेचा इशारा

सायबरहल्ल्याचा मोठा धोकाबर्लिन – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या वित्त क्षेत्रातील कंपन्यांना असलेला मोठ्या सायबरहल्ल्याचा धोका वाढला आहे, असा इशारा नियंत्रक संस्थने दिला. गेल्या दोन महिन्यात जर्मनीच्या ऊर्जा तसेच वाहनक्षेत्रातील कंपन्यांवर सायबरहल्ले झाले होते. त्यापाठोपाठ गेल्याच महिन्यात ‘फाईव्ह आईज्‌‍’ या गटाने रशिया मोठ्या सायबहल्ल्याची तयारी करीत असल्याचे बजावले होते. या पार्श्वभूमीवर जर्मन संस्थेने दिलेल्या इशाऱ्याचे गांर्भीय वाढले आहे.

युक्रेनचे युद्ध सुरू होण्यापूर्वी दोनदा युक्रेबवर सायबरहल्ले झाले होते. यासाठी रशियावर आरोप झाले होते. मात्र रशियाने हे आरोप फेटाळले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर हॅकर्सचा आंतरराष्ट्रीय गट ‘ॲनॉनिमस’ने रशियाविरोधात सायबरयुद्धाची घोषणा केली होती. त्याला रशियन हॅकर्सच्या गटाकडून प्रत्युत्तरही देण्यात आले होते. युक्रेनच्या भूमीवर संघर्ष सुरू असतानाच सायबरक्षेत्रातही युद्ध पेटल्याचे दिसत होते.

गेल्या दशकभरात आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या मोठ्या सायबरहल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचे आरोप अमेरिका व युरोपियन यंत्रणांनी केले होते. रशियाने केलेल्या सायबरहल्ल्यांच्या मुद्यावरून अमेरिका व युरोपिय देशांनी रशियावर निर्बंधांची कारवाईही केली होती. त्यानंतरही रशियाचे सायबरहल्ले थांबले नसून उलट युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांची तीव्रता व व्याप्ती अधिक वाढेल, अशी चिंता व्यक्त केली जाते.

गेल्या महिन्यात जर्मनीच्या ऊर्जा क्षेत्रातील तीन कंपन्यांना सायबरहल्ल्यांचा फटका बसला होता. जर्मन यंत्रणांनी याप्रकरणी संशयित गट अथवा देशाचे नाव जाहीर केले नसले तरी माध्यमांनी रशियाकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्यांमध्ये ‘डॉईश विंडटेक्निक’, ‘नॉर्डेक्स एसई’ व ‘एनरकॉन जीएमबीएच’ या कंपन्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ ‘कार रेन्टल’ क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या ‘सिक्सट्’ या कंपनीवर सायबरहल्ला झाल्याचे समोर आले होते.

सायबरहल्ल्याचा मोठा धोकाया सायबर हल्ल्यांच्या सत्रानंतर जर्मनीच्या वित्तक्षेत्रातील नियंत्रक संस्था असणाऱ्या ‘बाफिन’ने अर्थक्षेत्रातील कंपन्यांना सायबरहल्ल्याबाबत बजावले आहे. ‘रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अर्थ क्षेत्रातील कंपन्यांना असणारा सायबरहल्ल्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही प्रकरणांमध्ये अशा मोठ्या सायबरहल्ल्यामुळे अर्थ क्षेत्राच्या स्थैर्याला धक्का बसू शकतो. अशा सायबरहल्ल्यांसाठी जर्मन कंपन्या पूर्णपणे तयार आहेत, असे वाटत नाही’, अशा शब्दात ‘बाफिन’चे प्रमुख मार्क ब्रॅन्सन यांनी आपले निरिक्षण नोंदविले.

गेल्या महिन्यात ‘फाईव्ह आईज्‌‍’ या गटाने, युक्रेनला सहाय्य करणाऱ्या देशांवर रशिया मोठे सायबरहल्ले चढविण्याची तयारी रशिया करीत असल्याचे म्हटले होते. रशियासमर्थक हॅकर्सच्या गटांकडे अज्ञात राहून, मोठ्या प्रमाणात माहिती चोरण्याची क्षमता आहे, याची जाणीव ‘फाईव्ह आईज्‌‍’ने करून दिली होती. रशियन गुप्तचर यंत्रणा व संरक्षणदलांशी संबंधित 10 किंवा त्यातून अधिक हॅकर्सचे गट सक्रिय असल्याचेही ‘फाईव्ह आईज्‌‍’ने आपल्या इशाऱ्यात म्हटले होते. तर रशिया अशाच स्वरुपाचे आरोप अमेरिका व युरोपिय देशांवर केले आहेत. सायबरहल्ले चढवून त्याचे खापर रशियावर फोडण्याची तयारी या देशांनी केल्याचा ठपका रशियाने ठेवला आहे.

leave a reply