नाटोच्या सायबर सुरक्षा गटात दक्षिण कोरियाचा समावेश

सेऊल – नाटोने आपल्या सायबर सुरक्षा गटात दक्षिण कोरियाला सामील करून घेतल्याची घोषणा कोरियन गुप्तचर यंत्रणेने केली आहे. यामुळे दक्षिण कोरिया हा नाटोमध्ये सहभागी होणारा पहिला आशियाई देश ठरला आहे. ही बाब दक्षिण कोरियाचे शेजारी देश असलेल्या उत्तर कोरिया व चीनला चिथावणी देणारी ठरू शकते.

सायबर सुरक्षा गटातइस्टोनिया येथे स्थित नाटोच्या ‘कोऑपरेटिव्ह सायबर डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स-सीसीडीसीओई’ या गटामध्ये दक्षिण कोरियाचा अधिकृतरित्या समावेश झाला. ‘नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी-एनआयए’ या दक्षिण कोरियाच्या सहभागाची माहिती उघड केली. ‘सायबर हल्ल्यांमुळे एखादी व्यक्ती किंवा देशाचीच नाही तर इतर देशांची सुरक्षा देखील धोक्यात येत आहे. अशा परिस्थितीत, नाटोच्या सायबर सुरक्षा गटातील दक्षिण कोरियाच्या समावेशाने जागतिक सायबर सुरक्षेचा दर्जा उंचावेल’, अशी अपेक्षा दक्षिण कोरियन एनआयएने व्यक्त केली.

2008 साली रशियाने इस्टोनियावर केलेल्या भीषण सायबर हल्ल्यानंतर नाटोने ‘सीसीडीसीओई’ची स्थापना केली होती. नाटोच्या सदस्य देशांवरील सायबर हल्ले रोखणे, हा या संघटनेचा उद्देश आहे. दक्षिण कोरियाच्या सहभागानंतर सीसीडीसीओईतील सदस्य देशांची संख्या 32 वर गेली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध पेटलेले असताना, नाटोने दक्षिण कोरियाला सायबर सुरक्षा गटात सामील करून घेतले आहे, याकडे पाश्चिमात्य माध्यमे लक्ष वेधत आहेत.

दरम्यान, ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस यांनी गेल्याच आठवड्यात नाटोच्या विस्ताराचे संकेत दिले होते. अमेरिका, कॅनडा आणि युरोपिय देशांपर्यंत मर्यादित असणाऱ्या या लष्करी संघटनेने येत्या काळात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांनाही सामील करून घ्यावे, असे ट्रूस यांनी सुचविले होते. क्वाडचे सदस्य असलेल्या जपान, ऑस्ट्रेलिया यांच्यासह असियान संघटनेतील आग्नेय आशियाई देशांनाही नाटोत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता.

याद्वारे नाटोचे जागतिकीकरण सुरू असल्याची टीका युरोपातील काही वृत्तवाहिन्यांनी केली होती. असे झाल्यास युरोपच्या सुरक्षेसाठी उभी केलेल्या नाटोचा जगभरात विस्तार होईल आणि त्यामुळे आव्हाने वाढतील. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना सामील करून घेतल्यानंतर नाटो चीनशी उघडपण वैर ओढावून घेईल, असा इशारा या युरोपिय वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. मात्र या गटातील दक्षिण कोरियाचा सहभाग हा अमेरिका-नाटोच्या डावपेचांचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी, युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, रशियाच्या विरोधात जाण्यास नकार देणाऱ्या भारताला धडा शिकविण्याची तयारी अमेरिकेने केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. क्वाड या चीनच्या वर्चस्ववादाला रोखणाऱ्या संघटनेत भारताला पर्याय म्हणून दक्षिण कोरियाला सहभागी करून घेण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. दक्षिण कोरियाच्या एका वर्तमानपत्राने हे वृत्त प्रकाशित केले होते.

त्या पार्श्वभूमीवर, नाटोच्या सायबर सुरक्षाविषयक गटामध्ये दक्षिण कोरियाचा समावेश, ही लक्षवेधी बाब ठरते आहे.

leave a reply