अंकारा – गेल्या काही वर्षांपासून तुर्कीमधील शरणार्थी शिबिरांमध्ये असलेल्या 10 लाख सिरियन निर्वासितांना तुर्की लवकरच मायदेशी रवाना करणार आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी ही घोषणा केली. पाश्चिमात्य देशांकडून अब्जावधी डॉलर्सचे सहाय्य स्वीकारून तुर्कीने सिरियन निर्वासितांना आपल्या देशात जागा दिली खरी. पण निर्वासितांची वाढती संख्या आणि त्यांचे गंभीर गुन्हे हेच राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी घातक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सिरियन निर्वासितांना मायदेशी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जातो.
तुर्कीमध्ये सध्या 40 लाख 82 हजारांहून अधिक परदेशी निर्वासित आहेत. यामध्ये सिरियन निर्वासितांची संख्या जवळपास 37 लाख इतकी मोठी आहेत. तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक तसेच इतर देशांमधून दाखल झालेल्या बेकायदेशीर निर्वासितांची संख्या चार लाखांच्या जवळ आहे. तुर्कीचे अंतर्गत सुरक्षामंत्री इस्माईल कताक्ली यांनी रविवारी ही माहिती जाहीर केली.
गेल्या दहा वर्षांपासून सिरियात सुरू असलेल्या अराजकामुळे तुर्कीत दाखल झालेल्या सिरियन निर्वासितांपैकी सुमारे पाच लाख जण सुरक्षितरित्या सिरियात पोहोचल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केला होता. पण संयुक्त राष्ट्रसंघाने एर्दोगन यांचा हा दावा फेटाळला आहे. तुर्कीतून फक्त एक लाख, 30 हजार सिरियन निर्वासितच मायदेशी परतल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. यामुळे निर्वासितांबाबत राष्ट्राध्यक्ष एर्दोगन विपर्यास्त माहिती देत असल्याचे समोर आले होते.
त्यातच तुर्कीच्या सीमेवर शरणार्थी शिबिरांपर्यंत मर्यादित असलेले हे निर्वासित आता तुर्कीच्या प्रमुख शहरांपर्यंत पोहोचले आहेत. हे निर्वासित गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सिरियन निर्वासितांचा वापर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन आपल्या राजकीय विरोधकांविरोधात करीत असल्याची टीका केली जाते. तर पाकिस्तानी निर्वासित अपहरण व खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात सामील असल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते.
निर्वासितांच्या या गुन्ह्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची भूमिका जबाबदार असल्याची टीका तुर्कीत जोर पकडत आहे. तुर्कीमध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणामध्ये सुमारे 73 टक्के तुर्की नागरिकांनी एर्दोगन यांच्या या भूमिकेवर संताप व्यक्त केला होता. याचा फायदा एर्दोगन यांचे राजकीय विरोधक सीएचपी पक्षाचे नेते केमाल किलिचदारोग्लू यांना मिळत आहे. तर एर्दोगन यांच्या संयुक्त सरकारमधील एमएचपी या घटक पक्षाचे नेते डेवलेत बॅशेली यांनी देखील अनियंत्रित असलेले हे निर्वासित तुर्कीचा ताबा घेऊ शकतात, अशी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर, एर्दोगन यांना निर्वासितांबाबतच्या निर्णयात मोठा बदल करावा लागत असल्याचा दावा केला जातो. तरीही या निर्णयाचा एर्दोगन यांना विशेष लाभ मिळणार नाही. याने त्यांची घसरत असलेली लोकप्रियता वाढणार नाही, असे तुर्कीतील राजकीय विश्लेषक बजावत आहेत.