नायजेरियाच्या झाम्फारातील हल्ल्यांमध्ये 48 जण ठार

अबूजा – लुटारूंनी नायजेरियाच्या तीन गावांमध्ये चढविलेल्या हल्ल्यात 48 जणांचा बळी गेला. झाम्फाराच्या जंगलात तळ ठोकलेल्या लुटारूंचे नागरिकांवरील हल्ले ही नित्याची बाब बनल्याची टीका माध्यमे करीत आहेत. सुरक्षा यंत्रणांना लुटारूंची माहिती असूनही ते त्यांचा बंदोबस्त करीत नसल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.

नायजेरियाच्या वायव्येकडील झाम्फारा प्रांतातील दामरी, सबोन गारीनआणि कलाहे या तीन गावांमध्ये घुसून लुटारुंनी बेछूट गोळीबार केला. यापैकी एकट्या डामरी गावातील हल्ल्यामध्ये 32 जणांचा बळी गेला. तर बळींमध्ये दोन सुरक्षा जवान देखील ठार झाल्याचे येथील प्रशासकीय प्रमुख अमिनू सुलेमान यांनी ही माहिती दिली.

हे लुटारू प्रत्येकावर गोळीबार करीत होते. परत जाताना या लुटारूंनी या गावांमधील अन्नसाठा आणि गुरढोरांची चोरी केल्याचे सुलेमान यांनी सांगितले. या हल्ल्याबाबत नायजेरियन पोलीस प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या गावांपासून जवळच असलेल्या झाम्फाराच्या जंगलात या लुटारूंनी तळ ठोकल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या लुटारूंच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातो.

leave a reply