चीनला टक्कर देण्यासाठी जपानची तयारी

- अमेरिकेने जपानमधील युद्धनौकांची तैनाती वाढविली

टोकिओ – चीन कधीही तैवानवर हल्ला चढवू शकतो. असे झाल्यास तो आपल्यावरील हल्ला ठरेल, असा इशारा देणाऱ्या जपानने चीनला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे. तर तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या नौदलाने जपानमध्ये मोठ्या प्रमाणात अतिप्रगत युद्धनौका तैनात केल्या आहेत. या युद्धनौकांवर पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स तैनात आहेत. चीनच्या नौदलात पाणबुड्यांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे, हे लक्षात घेऊन सदर तयारी करण्यात येत आहे.

चीनला टक्कररशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर आत्मविश्वास बळावलेला चीन लवकरच तैवानचा घास गिळण्यासाठी हल्ला चढवू शकतो, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनचे सरकारी मुखपत्र देखील तैवानवर हल्ला चढविण्याची चिथावणी देत आहे. तर गेल्या काही आठवड्यांमध्ये तैवानच्या शस्त्रसज्जतेची चाचपणी करण्यासाठी चीनने आपल्या लढाऊ विमानांची तैवानच्या हद्दीतील घुसखोरी वाढविली आहे. ही तैवानवरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचा दावा जपान करीत आहे.

चीनने तैवानवर हल्ला चढविला तर तो आपल्यावरील समजण्यात येईल, असा इशारा जपानचे माजी पंतप्रधान ॲबे शिंजो यांनी काही आठवड्यांपूर्वी दिला होता. जपानचे इतर अधिकारी देखील तैवानच्या सुरक्षेसाठी आपला देश वचनबद्ध असल्याचे जाहीर करीत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये तैवानच्या हवाई तसेच सागरी क्षेत्रातील चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जपानने देखील चीनविरोधी संघर्षाची तयारी केल्याचा दावा सिंगापूर पोस्ट या दैनिकाने केला.

चीनला टक्करयासाठी सदर दैनिकाने गेल्या काही दिवसांपासून चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील हालचालींचा दाखला दिला. काही आठवड्यांपूर्वी चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सॉलोमन आयलंड या बेटसमुहांनी बनलेल्या देशाबरोबर सुरक्षाविषयक करार केला. यासंबंधी गोपनीय कागदपत्रे समोर आली असून यानुसार चीन सॉलोमनमध्ये लष्करी तळ उभारणार आहे. येत्या काळात चीनची कम्युनिस्ट राजवट पापुआ न्यू गिनी, वनातू आणि किरिबाती तसेच तैवानचे सहकारी देश असलेल्या मार्शल आयलँड्स, नाउरू आणि तुवालू या देशांबरोबरही करू शकतो, असा दावा सिंगापूर पोस्टने केला. अशा प्रकारे चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात लष्करी तळांचे जाळे विणत असल्याचे या दैनिकाचे म्हणणे आहे.

तर जपान आणि तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या नौदलाने आपल्या अतिप्रगत युद्धनौकांची जमवाजमव सुरू केली आहे. अमेरिकेची अजस्त्र विमानवाहू युद्धनौका युएसएस रोनाल्ड रिगन जपानच्या योकोसुको बंदरात तैनात आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या ओकिनावा बेटाजवळून प्रवास केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या नौदलाने ही तैनाती केल्याचा दावा केला जातो.

leave a reply