सिडनी – चीनच्या हेरगिरी जहाजाने ऑस्ट्रेलियाच्या सागरी हद्दीजवळून प्रवास केला. चीनची ही कारवाई म्हणजे आपल्या देशाविरोधातील आक्रमकता असल्याचा ठपका ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी ठेवला आहे. चीनपासून संभवणाऱ्या धोक्याबाबत तैवानने देखील ऑस्ट्रेलियाला सावध केले आहे. चीन नावाचा धोका ऑस्ट्रेलियाच्या दारापर्यंत पोहोचल्याचा इशारा तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी दिला. सॉलोमन आयलंडमधील चीनची लष्करी तैनाती ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला आव्हान देणारी असेल, असे तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे.
तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध झाली. चीनने सॉलोमन आयलंड या देशाबरोबर केलेल्या लष्करी करारावर तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ताशेरे ओढले. तसेच चीनने ऑस्ट्रेलियाच्या प्रभाव क्षेत्रात आपला प्रभाव वाढविल्याची आठवण परराष्ट्रमंत्री जोसेफ यांनी करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या दाराजवळ येऊन ठेपलेल्या या धोक्याविरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या समविचारी देशांनी चीनच्या लष्करी हालचालींकडे अधिक बारकाईने पाहणे आवश्यक असल्याचे परराष्ट्रमंत्री जोसेफ यांनी म्हटले आहे.
सॉलोमन आयलंडमध्ये चीन लष्करी तळ उभारीत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया करीत आहे. सॉलोमन आयलंड हा ऑस्ट्रेलियापासून 1,700 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. चीन आपल्या देशात लष्करी तळ उभारत नसल्याचे सॉलोमन आयलंडच्या नेत्यांनी ऑस्ट्रेलियाला आश्वस्त केले आहे. पण सॉलोमन आयलंडमधील चीनची लष्करी हालचाल आपल्यासाठी रेड लाईन ठरेल, असे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बजावले होते.
अशा परिस्थितीत, गेल्या आठवड्यात चीनच्या हेरगिरी जहाजाने ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत धडक मारली होती. ऑस्ट्रेलियन किनारपट्टीपासून 50 सागरी मैल अंतराजवळून चीनच्या जहाजाने प्रवास केल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री डटन यांनी दिली. नौदलाचे अतिसंवेदनशील ठिकाण असलेल्या ‘एक्समाऊथ’पासून चीनच्या जहाजाने हा प्रवास केल्यामुळे ऑस्ट्रेलिया चिंता व्यक्त करीत आहे. चीनचे जहाज हेरगिरीसाठीच आले होते, असा आरोप ऑस्ट्रेलिया करीत आहे.
येत्या 21 मे रोजी ऑस्ट्रेलियामध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारची लोकप्रियता कमी झाल्याचा दावा ऑस्ट्रेलियन माध्यमे करीत आहेत. चीन-सॉलोमन आयलंडमधील सुरक्षा करार यासाठी कारण असल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. चीनचा धोका ओळखण्यात पंतप्रधान मॉरिसन अपयशी ठरल्याचा आरोप ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षनेते करीत आहेत. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीजवळ आपली विनाशिका रवाना करून चीन पंतप्रधान मॉरिसन यांच्यासमोरील अडचणी वाढवित आहे. पंतप्रधान मॉरिसन यांच्या विरोधकांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.