नवी दिल्ली – शस्त्रास्त्रे आणि संरक्षणसाहित्यासाठी दुसऱ्या देशांवर विसंबून राहता येणार नाही, हा धडा युक्रेनच्या युद्धाने भारताला दिलेला आहे, असे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी म्हटले होते. नवे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या देशांतर्गत निर्मितीला सर्वोच्च प्रधान्य दिले जाईल, अशी घोषणा केली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही माझगाव डॉक येथे युद्धनौकांच्या जलावतरणाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षणक्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित केले होते.
संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजय कुमार यांनी ‘श्रीजन पोर्टल’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केली. हे पोर्टल ‘डॅश बोर्ड’सारखे काम करील. या पोर्टलवरून शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या देशांतर्गत निर्मितीच्या आघाडीवर सुरू असलेल्या साऱ्या हालचालींची माहिती मिळेल. ही पारदर्शक माहिती शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याशी निगडीत असलेल्या सरकारी कंपन्यांची कामगिरी या पोर्टलद्वारे तपासून पाहता येणार आहे. विशेषतः त्यांना मिळणाऱ्या ऑडर्स व त्याचे तपशील याची सारी माहिती सदर पोर्टलवर असेल, असे अजय कुमार म्हणाले.
सध्या हे पोर्टल संरक्षणक्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांकडून वापरले जाईल. पण लवकरच या क्षेत्राशी निगडीत असलेल्या देशातील खाजगी कंपन्यांनाही हे पोर्टल पाहता येईल. यामुळे मिळालेल्या माहितीमधून आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींची कल्पना खाजगी कंपन्यांना येईल. यामुळे खाजगी कंपन्या संरक्षणसाहित्याच्या देशांतर्गत निर्मितीसाठी अधिक चांगल्यारितीने योगदान देऊ शकतील, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात व्यक्त केला आहे.
गेल्याच महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 100 संरक्षणसाहित्याची सूची जाहीर करून त्याच्या आयातीवर बंदीची घोषणा केली होती. यामुळे देशातील संरक्षणसाहित्याच्या निर्मितीला वेग मिळेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला होता. तर पुढच्या पाच वर्षांच्या काळात संरक्षण मंत्रालयाकडून सुमारे दोन लाख, 10 हजार कोटी रुपयांच्या ऑडर्स देशातील उद्योगक्षेत्राला मिळतील, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. याचा फार मोठा लाभ संरक्षणक्षेत्राला मिळेल. संरक्षणसाहित्याचा सर्वात मोठा आयातदार देश ही ओळख पुसून भारत आता संरक्षणसाहित्याची निर्मिती व निर्यात करणारा देश म्हणून उदयाला येईल, असा विश्वास यामुळे व्यक्त करण्यात येत आहे.