इराणच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून सौदी-कुवैत दुर्रा इंधनक्षेत्रावर काम सुरू करणार

मनामा – पर्शियन आखातातील वादग्रस्त इंधनसंपन्न क्षेत्रावरुन सौदी अरेबिया, कुवैत यांचा इराणबरोबर नवा तणाव निर्माण झाला आहे. इराणच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून सौदी व कुवैतने दुर्रा इंधनक्षेत्रात काम सुरू करण्याचे स्पष्ट केले. सौदीचे ऊर्जामंत्री प्रिन्स अब्दुलअझिझ बिन सलमान यांनी ही घोषणा केली. दुर्रा इंधनक्षेत्रातून दर दिवशी एक अब्ज क्युबिक फूट इंधनवायू तर 84 हजार बॅरल्स प्रति दिन कच्च्या तेलाचा उपसा होऊ शकतो. यामुळे इंधन क्षेत्रावरुन पर्शियन आखातातील देशांमध्ये असलेला तणाव वाढण्यास मदत होणार आहे.

पर्शियन आखातातील अराश किंवा दुर्रा नावाने ओळखले जाणारे इंधनक्षेत्र सौदी अरेबिया, कुवैत आणि इराण या तीन देशांमध्ये विभागले गेलेले आहे. इराण आणि कुवैत यांच्यात निश्चित सागरीसीमा नसल्यामुळे या इंधनक्षेत्रावर दोन्ही देशांकडून समान अधिकार सांगितला जातो. 1967 साली सापडलेल्या या इंधनक्षेत्रात जवळपास 20 ट्रिलियन क्युबिक फूट इतका इंधनवायू असल्याचा दावा केला जातो. गेली काही वर्षे क्षेत्रीय तणावामुळे अराश इंधनक्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले होते.

पण साधारण दीड महिन्यांपूर्वी सौदी अरेबिया आणि कुवैतने सदर इंधनक्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता. सौदी व कुवैतच्या इंधनमंत्र्यांनी यासंबंधीचा करारही केला होता. यानुसार सदर इंधनक्षेत्रातून प्रति दिन एक अब्ज क्युबिक फूट इतके इंधनवायूचे उत्पादन केले जाईल, असा दावा केला जातो. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनवायूची वाढती मागणी आणि त्याबरोबर कडाडणाऱ्या किंमती लक्षात घेता, सौदी व कुवैतमधील कराराचे महत्त्व वाढले होते. मात्र सौदी-कुवैतमधील या कराराला इराणने कडाडून विरोध केला होता.

या इंधनक्षेत्रावर सौदी, कुवैतप्रमाणे आपलाही हक्क असल्याचे इराणने म्हटले होते. तसेच या क्षेत्राच्या विकासावर आपलाही तितकाच अधिकार असल्याचे सांगून सौदी-कुवैतमध्ये झालेला हा करार बेकायदेशीर असल्याची टीका इराणने केली होती. इराणच्या सहभागाशिवाय या इंधनक्षेत्राचा विकास होऊ शकत नसल्याचा इशारा इराणने दिला होता. तसेच या क्षेत्रात स्वतंत्रपणे विकास व उत्खनन करण्याचे संकेत इराणने दिले होते. त्यामुळे पर्शियन आखातात तणाव निर्माण झाल्याचा दावा माध्यमांनी केला होता.

अशा परिस्थितीत, सौदीने दुर्रा इंधनक्षेत्रातील विकास व उत्खननाचे काम सुरू करणार असल्याचे ठणकावले. सौदीच्या या निर्णयावर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

leave a reply