इस्लामाबाद – सौदी अरेबिया, युएई या मित्रदेशांनी पाकिस्तानला आर्थिक सहाय्य करण्याचे नाकारले. तर ‘आयएमएफ’ने देखील पाकिस्तानला बेलआऊट देण्याआधी कठोर मागण्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानने चीनकडे नव्या कर्जासाठी हात पसरले आहेत. पाकिस्तानच्या या अवस्थेचा फायदा घेऊन चीनने नवे कर्ज देण्याची तयारी केली आहे. पण त्याच्या मोबदल्यात पाकिस्तानने आपल्या देशातील लष्करी चौक्या वापरण्याची परवानगी चिनी लष्कराला द्यावी, अशी शर्त चीनने ठेवली आहे. पाकिस्तानातील राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने काही वृत्तसंस्थांनी ही माहिती दिली. दरम्यान, शनिवारी चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानचे लष्करप्रमुख व आयएसआय प्रमुखांची भेट घेतली होती.
महिन्याभरापूर्वी पाकिस्तानच्या कराची विद्यापीठाच्या आवारात चीनच्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट’च्या अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मोटारीवर आत्मघाती हल्ला झाला होता. यामध्ये कन्फ्युशिअस इन्स्टिट्युटच्या प्रमुखासह आणखी दोन अधिकारी जागीच ठार झाले होते. स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेच्या माजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच येत्या काळात चिनी नागरिक तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी ग्वादरमध्ये तैनात चिनी जवानांनाही लक्ष्य केले जाईल, असा इशारा बलोच बंडखोरांनी दिला होता.
कराचीतील स्फोट आणि त्यानंतर बलोच बंडखोरांनी दिलेल्या धमकीमुळे हादरलेल्या चीनने थेट पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले चढविण्याची सूचना चीनच्या सरकारी मुखपत्राने केली होती. तसेच पिपल्स लिबरेशन आर्मीने आपले लष्करी पथक पाकिस्तानात रवाना करावे, असे सुचविले होते. पाकिस्तानात नव्याने सत्तेवर आलेल्या शाहबाज शरीफ यांच्या सरकारने कराची स्फोटावर चिंता व्यक्त करून चिनी नागरिकांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची घोषणा केली होती. पण यानंतरही पाकिस्तानात वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करणारे चिनी अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व नागरिकांनी तातडीने चीनकडे पलायन केले.
या सर्व घडामोडी सुरू असताना, पंतप्रधान शरीफ यांनी सौदी अरेबिया आणि युएईचा दौरा करूनआपल्या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पण सौदी व युएईने पाकिस्तानला अर्थसहाय्य करण्याचे नाकारले. तर 18 मे रोजी कतारची राजधानी दोहा येथे आयएमएफचे अधिकारी आणि पाकिस्तानी नेत्यांमध्ये झालेली बैठकही अपयशी ठरली. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा चीनकडे धाव घ्यावी लागली आहे. पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो सध्या चीनच्या दौऱ्यावर असून त्यांनी परराष्ट्रमंत्री वँग ई यांची भेट घेतली.
त्याआधीच चीनने पाकिस्तानसमोर आपल्या नव्या मागण्या ठेवल्याचा दावा केला जातो. नवे कर्ज हवे असेल तर पाकिस्तानने शीतयुद्धाच्या काळात आणि दहशतवादविरोधी युद्धात अमेरिकेला दिलेले आपल्या देशातील तळ किंवा लष्करी चौक्या वापरण्याची परवानगी चीनला द्यावी, अशी मागणी चीनने समोर ठेवली आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या जवळ असलेल्या पाकिस्तानातील शम्सी हवाईतळाचा समावेश असल्याचा दावा केला जातो.
गेल्या काही दिवसांमधील घडामोडी लक्षात घेता, पाकिस्तान चीनला लष्करी तळ देण्यासाठी तयार झाल्याची शक्यता वाढली आहे. कराचीमधील स्फोटानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनला भेट देऊन चिनी नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याची तयारी दाखवली होती. पण चीनने ही मागणी धुडकावली होती. त्यानंतर चीनने पाकिस्तानकडे लष्करी चौक्यांबाबत केलेली मागणी व पुढच्या काही तासात पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना बोलावून चीनने निराळेच संकेत दिले आहेत.
त्याचबरोबर चीनच्या गुप्तचर यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी चेंग गुओपिंग पाकिस्तानात दाखल झाले आहेत. चेंग यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा आणि आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजूम यांची भेट घेतली. पाकिस्तानात महत्त्वाचे निर्णय सरकार नाही, तर लष्कराकडून घेतले जातात. त्यामुळे चिनी अधिकाऱ्याच्या या भेटीचे गांभीर्य वाढले आहे.