सॉलोमन आयलँडनंतर चीन किरिबाती, वनातूबरोबर सुरक्षा करार करणार

किरिबातीलंडन – सॉलोमन आयलँडबरोबर सुरक्षा करार केल्यानंतर चीनने पॅसिफिक क्षेत्रातील इतर छोट्या बेटदेशांशी लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या शेजारी असलेल्या किरिबाती आणि वनातू या देशांबरोबर सुरक्षा करार करण्यासाठी चीनने चर्चा सुरू केली आहे. याद्वारे चीन पॅसिफिक क्षेत्रातील आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा ब्रिटनच्या आघाडीच्या दैनिकाने केला आहे.

गेल्या महिन्यात चीनने सॉलोमन आयलँड या देशासह सुरक्षा करार केला. या करारानुसार चीन सॉलोमनमध्ये लष्करी तळ उभारीत असल्याची माहिती उघड झाली होती. सॉलोमन आयलँडपासून अवघ्या दोन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने यावर चिंता व्यक्त केली होती. या बेटदेशावरील चीनचे लष्करी तळ आपल्या सुरक्षेसाठी आव्हान असल्याची टीका ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली होती.

त्यातच चीनने पॅसिफिक क्षेत्रातीलच किरिबाती आणि वनातू या देशांबरोबरही सुरक्षा करार करण्यासाठी हालचाली वाढवून ऑस्ट्रेलियावरील दडपणात भर घातलीआहे. सॉलोमन आयलँडप्रमाणेच चीन या दोन्ही बेटदेशांबरोबर करार करणार असल्याचा दावा ‘द फायनॅन्शिअल टाईम्स’ या ब्रिटीश दैनिकाने केला. तोंगा या आणखी एका बेटदेशाबरोबरही चीन असाच करार करण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

सॉलोमन आयलँडप्रमाणे वनातू हा ऑस्ट्रेलियाच्या जवळ असलेला बेटदेश आहे. त्यामुळे वनातूबरोबरील चीनचा सुरक्षा करार ऑस्ट्रेलियासाठी आव्हान ठरेल, असे या दैनिकाचे म्हणणे आहे. पण पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचाली ऑस्ट्रेलियाप्रमाणेच अमेरिकेच्या हवाई बेटांसाठी धोकादायक असल्याचा दावा केला जातो.

किरिबाती हा बेटदेश पॅसिफिक महासागरात असलेल्या अमेरिकेच्या हवाई बेटापासून अवघ्या तीन हजार किलोमीटर अंतरावर आहे. हवाई बेटावर अमेरिकेचे लष्करी तसेच हवाईतळ आहे. त्यामुळे किरिबातीबरोबर लष्करी करार करून चीन पॅसिफिक क्षेत्रातील प्रभाव वाढवित आहे. तसेच अमेरिकेच्या सुरक्षेला आव्हान देत असल्याचा दावा ब्रिटीश दैनिक करीत आहे. पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या या हालचाली अतिशय चिंताजनक असल्याचे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply