इराणची लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येचा सूड घेण्याची धमकी

हत्येचा सूडतेहरान – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे वरिष्ठ अधिकारी कर्नल हसन सय्यद खोदायी यांची हत्या घडविणाऱ्यांचा सूड घेतल्यावाचून राहणार नाही, अशी धमकी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी दिली. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील उद्दामपणाचे हस्तक असलेल्यांनी इराणच्या लष्करी अधिकाऱ्याचा बळी घेतल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ठेवला आहे. उघड उल्लेख टाळून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी कर्नल खोदायी यांच्या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. दरम्यान, इराणशी हातमिळवणी केलेल्या पॅलेस्टिनींच्या हमास या कट्टरवादी संघटनेने इस्रायलवर हल्ल्याची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी सोमवारी देशाच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना कर्नल खोदायी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याची सूचना केली. तसेच कर्नल खोदायी यांची हत्या घडविणाऱ्यांचा लवकरच सूड घेतला जाईल, असे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी जाहीर केले. कर्नल खोदायी यांच्या हत्येसाठी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी किंवा रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी उघडपणे कुणावरही आरोप करण्याचे टाळले. पण राष्ट्राध्यक्ष रईसी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी सलग दोन दिवस एकच शब्दप्रयोग करून इस्रायलवर निशाणा साधल्याचे दिसत आहे. कर्नल खोदायी यांची हत्या जागतिक पातळीवरील उद्दामपणाच्या हस्तकांनी केल्याचा ठपका राष्ट्राध्यक्ष रईसी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी ठेवला. याआधीही इराणने असा शब्दप्रयोग इस्रायलसाठी केला होता. त्यामुळे आत्ताही इराण आपल्या लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार धरल्याचे स्पष्ट होत आहे. इराणची सरकारी माध्यमे देखील इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्याची हत्या घडविल्याचा आरोप करीतआहेत. इराणच्या या आरोपांवर इस्रायलने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.

हत्येचा सूडरविवारी दुपारी इराणची राजधानी तेहरानमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी कर्नल खोदायी यांची त्यांच्या घरासमोर गोळ्या घालून हत्या केली. कर्नल खोदायी मोटारीत असताना हा हल्ला झाला. कर्नल खोदायी हे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्‌‍मधील कुद्स फोर्सेसचे वरिष्ठ अधिकारी होते. 2020 साली अमेरिकेने इराकमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेले कासिम सुलेमानी यांचा उजवा हात म्हणून खोदायी यांना ओळखले जात होते.

त्याचबरोबर सिरियातील कुद्स फोर्सेसच्या कारवायांचे नेतृत्व कर्नल खोदायी यांच्याकडे होते. इराणमधून येणारी शस्त्रास्त्रे हिजबुल्लाहपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कर्नल खोदायी यांच्याकडे होती. तसेच इस्रायली आणि ज्यूधर्मियांच्या अपहरणाचा कट आखणाऱ्यांमध्येही कर्नल खोदायी यांचा समावेश असल्याचा दावा इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमे करीतआहेत. त्यामुळे कर्नल खोदायी यांची हत्या इराणसाठी हादरा ठरते. म्हणून इराणने कर्नल खोदायी यांच्या हत्येचा सूड घेण्याबाबत दिलेली धमकी अतिशय गंभीर ठरते.

leave a reply