न्यूक्लिअर बॅलेस्टिक मिसाईलसाठी सौदीला चीन सहाय्य पुरवितआहे

- ब्रिटनच्या दैनिकाचा दावा

लंडन – बायडेन प्रशासनाच्या इराणबाबतच्या धोरणांमुळे नाराज झालेला सौदी अरेबिया चीनबरोबर लष्करी सहकार्य वाढवित आहे. चीन सौदीला अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीत सहाय्य करीत असल्याचा दावा ब्रिटनच्या दैनिकाने केला. सौदीची राजधानी रियाधजवळ या क्षेपणास्त्राची निर्मिती सुरू आहे. आधीच अतिशय धोकादायक बनलेल्या आखाती क्षेत्रातील सौदीची ही शस्त्रसज्जता अधिकच घातक ठरेल, असे या दैनिकाने बजावले आहे.

ब्रिटनच्या लेंसेस्टर विद्यापीठातील अण्वस्त्र विश्लेषिका लुडोविचा कासेली यांनी स्थानिक दैनिकाशी बोलताना आखातातील परिस्थिती स्फोटक बनल्याची चिंता व्यक्त केली. यासाठी कासेली यांनी युक्रेन निर्मिती करीत असलेल्या ‘हॉरर वेपन्स’चा दाखला दिला. चीन सौदीला सदर हॉरर शस्त्राची निर्मिती करण्यासाठी सहाय्य करीत असल्याचे कासेली म्हणाले.

2019 साली चीनने सौदीबरोबर क्षेपणास्त्र निर्मितीसंबंधी करार केल्याचे उघड झाले होते. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून चीनने सौदीमध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. अमेरिकेच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने याची माहिती उघड केली होती, याची आठवण कासेली यांनी करुन दिली. सौदी अरेबियाची राजधानी रियाधजवळ असलेल्या अल-दवादी या ठिकाणी सौदीचा प्रकल्प असल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ देखील प्रसिद्ध झाले होते.

ब्रिटिश विश्लेषिका कासेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदीतील या प्रकल्पात वेगाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती सुरू आहे. यासाठी युक्रेनने सौदीला सहाय्य पुरविल्याचा दावा कासेली यांनी सूत्रांच्या हवाल्याने केला. युक्रेन 300 किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या ग्रोम-2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती करीत आहे. युक्रेनने याच क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान सौदीला पुरविल्याचे कासेली यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सौदी लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी देखील प्रयत्न करीत असल्याचे संकेत कासेली यांनी दिले.

आण्विक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी चीन सौदीला सहाय्य करीत असल्याचे कासेली यांनी स्पष्ट केले. तसेच या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती असेल, याबाबत सध्या काहीही सांगणे योग्य ठरणार नसल्याचे कासेली म्हणाले. याआधी जानेवारी महिन्यात देखील सौदी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनच्या सहकार्याने सौदी तीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती करीत असल्याचे अमेरिकेच्या वृत्तवाहिनीने म्हटले होते. येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांविरोधी शस्त्रसज्जता म्हणून सौदी आपल्या लष्करी सामर्थ्यात वाढ करीत असल्याचा दावा अमेरिकी वृत्तवाहिनीने केला होता. पण सौदीची ही शस्त्रसज्जता इराणसाठी इशारा असल्याचे आखातातील विश्लेषकांनी म्हटले होते.

इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर आपणही मागे राहणार नसल्याचे सौदीने याआधीच बजावले होते. तरीही इराणबरोबरच्या अणुकरारावर ठाम असणाऱ्या बायडेन प्रशासनामुळे संतापलेला सौदी अरेबिया देखील अणुबॉम्बने सज्ज होईल, असे अमेरिकेतील लष्करी विश्लेषक सांगत आहेत. यासाठी सौदी पाकिस्तानकडून अणुबॉम्ब मिळवू शकतो, याकडेही विश्लेषकांचे लक्ष वेधले होते. अशा परिस्थितीत, चीन सौदीला अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीत करीत असलेले सहाय्य आखाती क्षेत्राबरोबरच अमेरिकेच्याही चिंतेत भर घालणारी बाब ठरत आहे.

leave a reply