बीजिंग/कॅनबेरा – चीनकडून पॅसिफिक बेटदेशांमधील प्रभाव वाढविण्यासाठी सुरू झालेल्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिका व ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेतला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी पॅसिफिक बेटदेशांच्या दौऱ्यावर असतानाच ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही या क्षेत्रातील आघाडीचा देश असणाऱ्या फिजीला भेट दिली आहे. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी चीनविषयक धोरणाची घोषणा करताना, अमेरिका चीनचा धोका रोखण्यासाठी आक्रमक पावले उचलेल, असे जाहीर केले आहे.
गेल्या महिन्यात चीनने सॉलोमन आयलँड या देशासह सुरक्षा करार केला. या करारानुसार चीन सॉलोमनमध्ये लष्करी तळ उभारीत असल्याची माहिती उघड झाली होती. सॉलोमन आयलँडपासून अवघ्या दोन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने यावर चिंता व्यक्त केली होती. या बेटदेशावरील चीनचे लष्करी तळ आपल्या सुरक्षेसाठी आव्हान असल्याची टीका ऑस्ट्रेलिया सरकारने केली होती. मात्र चीनच्या कारवाया फक्त सॉलोमन आयलँडपुरत्याच मर्यादित नसून पॅसिफिकमधील 10 बेटदेशांवर वर्चस्व मिळविण्यासाठी नवा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.
‘कॉमन डेव्हलपमेंट व्हिजन’ नावाच्या या प्रस्तावाला सर्व पॅसिफिक बेटदेशांनी मान्यता द्यावी यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी गुरुवारपासून सात पॅसिफिक बेटदेशांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात सॉलोमन आयलँडपासून झाली असून त्यानंतर त्यांनी समोआला भेट दिली. या भेटीत चीन व समोआमध्ये काही करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याचे सांगण्यात येते. यात चीनने प्रस्तावित केलेल्या ‘कॉमन डेव्हलपमेंट व्हिजन’चा समावेश आहे का याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
मात्र चिनी परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा व इतर हालचालींवर अमेरिका तसेच ऑस्ट्रेलियाने चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही देशांनी चीनला रोखण्यासाठी पुढाकार घेतला असून ऑस्ट्रेलियाच्या नव्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांनी तातडीने फिजी या पॅसिफिक बेटदेशाला दिलेली भेट त्याचाच भाग मानला जातो. ऑस्ट्रेलियातील नव्या सरकारनेही पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या सहाय्यासाठी पाच अब्ज डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनबाबतचे नवे धोरण घोषित करताना पॅसिफिकवर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले आहेत.