रशियावर निर्बंध लादून युरोप ‘एनर्जी सुसाईड’ करीत आहेत

- रशियन इंधनकंपनीच्या प्रमुखांचा इशारा

Russia-Rosneftमॉस्को – अमेरिकेच्या तालावर नाचून रशियावर निर्बंध लादणारे युरोपिय देश ‘एनर्जी सुसाईड’ करीत आहेत. अर्थात रशियाच्या इंधन आणि इंधनवायूची आयात बंद करून युरोपिय देश स्वत:च्याच पायावर गोळ्या झाडत आहेत’, असा इशारा रोझनेफ्ट या रशियन इंधनकंपनीचे प्रमुख इगोर सेशीन प्रमुखांनी दिला. त्याचबरोबर युरोपिय देश रशियाच्या इंधनाकडे पाठ फिरवित असताना, ब्रिटीश इंधननिर्मिती कंपनी अजूनही रोझनेफ्टची समभागधारक असल्याची माहिती सेशीन यांनी दिली.

रशियाची आघाडीची इंधनकंपनी ‘गाझप्रोम’ने गेल्या काही दिवसात जर्मनीला करण्यात येणारा नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा घटविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच दिवसात रशियाने ‘नॉर्ड स्ट्रीम1′ इंधनवाहिनीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या इंधनवायूचा पुरवठा तब्बल 60 टक्क्यांनी कमी केला आहे. याआधी रशियाने बल्गेरिया, डेन्मार्क व फिनलँड यासारखा देशांचा इंधनपुरवठा बंद केला होता. तर दोन दिवसांपूर्वी जर्मनी, फ्रान्स, इटली व ऑस्ट्रियाच्या इंधनकंपन्यांनीही रशियन इंधनवायुचा पुरवठा कमी झाल्याचे दावे केले होते. नजिकच्या काळात रशिया युरोपिय देशांना करण्यात येणारा नैसर्गिक इंधनवायूचा पुरवठा रोखू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

RosNeftयासाठी रशियाने तांत्रिक अडचणींचे कारण दिले आहे. पण रशियाने पुढे केलेले कारण पटण्यासारखे नसून इंधनवायूचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय हा राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप जर्मनीने केला होता. पण अमेरिकेला साथ देऊन युक्रेनला शस्त्रसज्ज करणाऱ्या आणि रशियावर निर्बंध लादणाऱ्या युरोपिय देशांना धडा शिकविण्यासाठी रशियाने ही कारवाई केल्याचा दावा केला जातो. रशियाच्या या निर्णयाचे तीव्र परिणाम हिवाळ्याच्या काळात भोगावे लागतील, अशी चिंता युरोपिय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी ‘सेंट पीट्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरम’मध्ये बोलताना रोझनेफ्टचे प्रमुख इगोर सेशीन यांनी युरोपिय देशांना आणखी एक इशारा दिला.

युरोपिय देशांनी अमेरिकेचे ऐकून रशियावर निर्बंध लादले तर त्याचे परिणाम युरोपिय देशांनाच होणार असल्याचे सेशीन यांनी बजावले. पण युरोपातील आघाडीचे देश रशियाकडून इंधन खरेदी करणार नसल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. याचे परिणाम युरोपिय देशांमधील इंधनाच्या किंमतीवर दिसू लागले आहेत. युरोपमधील इंधनाचे दर प्रचंड प्रमाणात कडाडले असून याचा जबर फटका येत्या काही महिन्यांमध्ये युरोपिय देशांना बसेल, असा दावा केला जातो.

leave a reply