अमेरिकी राष्ट्राध्यक्षांआधी सौदीचे क्राऊन प्रिन्स आखाताच्या दौऱ्यावर

कैरो – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन पुढच्या महिन्यात आखाती देशांचा दौरा करणार आहेत. यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा करतील. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सौदीचे समर्थन मिळविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रयत्न करणार असल्याचा दावा केला जातो. त्याआधीच क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इजिप्तपासून आपल्या सहकारी देशांचा दौरा सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, सौदीचे क्राऊन प्रिन्स या दौऱ्याद्वारे सहकारी देशांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतील, असे आखाती माध्यमांचे म्हणणे आहे.

Prince-Gulfसौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सोमवारी इजिप्तची राजधानी कैरोमध्ये दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्सचे जंगी स्वागत केले. यावेळी सौदी आणि इजिप्तमध्ये सुमारे 7.7 अब्ज डॉलर्सचे गुंतवणुकीबाबतचे 14 करार पार पडले. त्याचबरोबर इंधनाच्या क्षेत्रातील सहकार्याबाबतही दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा दावा केला जातो. यानंतर क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान जॉर्डन व तुर्कीचा दौरा करणार आहेत.

अरब-आखातातील आपल्या सहकारी देशांच्या या दौऱ्यामागे सौदीच्या क्राऊन प्रिन्सचे वेगळे उद्दिष्ट असल्याचे आखातातील माध्यमांचे म्हणणे आहे. यापैकी इजिप्त आणि जॉर्डनचा दौरा करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सौदीच्या जुन्या सहकारी देशांबरोबरील सहकार्य मजबूत करणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आखात दौऱ्याआधी सौदीच्या क्राऊन प्रिन्सनी केलेला हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आखातात दाखल होतील. इस्रायल व वेस्ट बँकचा दौरा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन सौदीचे राजे सलमान यांच्याशी द्वीपक्षीय सहकार्यावर चर्चा करतील. तसेच अरब देशांच्या ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल’च्या विशेष बैठकीतही सहभागी होतील. यामध्ये सौदीबरोबर बाहरिन, कुवैत, ओमान, कतार, युएई तसेच इजिप्त व इराकचा सहभाग असणार आहे.

या बैठकीच्या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आखाती देशांकडून इंधनाची उत्पादकता वाढवून युरोपिय देशांना सहाय्य करण्याचा प्रस्ताव देऊ शकतात, असा दावा केला जातो. याआधीही बायडेन प्रशासनाने इंधनाच्या तुटवड्याप्रकरणी सौदी, युएई व इतर अरब देशांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन्ही देशांच्या नेत्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या फोनला उत्तर देण्याचे टाळले होते. यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर जोरदार टीका झाली होती. मात्र पुढच्या महिन्यातील सौदीच्या भेटीत बायडेन जेद्दा येथे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांची विशेष भेट घेणार आहेत. त्याआधी क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी इजिप्त व जॉर्डनचा केलेला दौरा लक्षवेधी ठरतो.

leave a reply