मालीतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 132 जणांचा बळी

बंकास – आफ्रिकेच्या मालीमध्ये दहशतवाद्यांनी तीन गावांमध्ये घडविलेल्या रक्तपातात 132 जणांचा बळी गेला. अल कायदासंलग्न ‘मसिना कतिबा ऑफ अमादौ कौफा’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हे हत्याकांड घडविल्याचा दावा केला जातो. माली हा आफ्रिकेच्या साहेल भूप्रदेशातील देश आहे. गेल्या दहा दिवसात साहेल भूप्रदेशात दहशतवाद्यांनी घडविलेला हा तिसरा हल्ला ठरतो. मालीच्या ‘मोप्ती’ या प्रांतातील तीन गावांवर शनिवारच्या मध्यरात्रीनंतर अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनेने हल्ले चढविले होते.

दियालासोगू, दियावेली आणि देसागू या तीन गावांमध्ये दहशतवाद्यांनी भीषण नरसंहार केला. संयुक्त राष्ट्रसंघाने मालीतील या दहशतवादी हल्ल्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली. 2012 सालापासून मालीमध्ये अल कायदा आणि आयएस या दहशतवादी संघटनांचा प्रभावआहे. या दहशतवादी संघटना दशकभरापासून मालीमध्ये घातपात घडवित आहेत. त्याचे पडसाद शेजारच्या बुर्किना फासोमध्ये उमटत आहेत. आठवड्यापूर्वी बुर्किना फासोमध्ये आयएस संलग्न दहशतवादी संघटनेने भीषण हल्ला चढविला होता. तर रविवारी मालीमध्येच शांतीसैनिकांच्या जवानांवर हल्ले झाले होते.

मालीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सुमारे 12 हजार शांतीसैनिक तैनात आहेत. याशिवाय दोन हजार पोलीस देखील या शांतीमोहिमेचा भाग आहेत. आत्तापर्यंत मालीमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 270 जवान ठार झाले आहेत.

leave a reply