वॉशिंग्टन – सिरियातील इराणसंलग्न ठिकाणांवरील हल्ल्यांबाबत इस्रायलने अमेरिकेला पूर्वसूचना दिली होती. पण इराणमधील छुप्या हल्ल्यांबाबत इस्रायलने अमेरिकेला अंधारात ठेवल्याची माहिती समोर येत आहे. इराणच्या अणुशास्त्रज्ञांवरील हल्ल्याविषयी इस्रायलने बायडेन प्रशासनाला कळू दिले नसल्याचे अमेरिकी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ अधिकारी सय्यद खोदाई तसेच आणखी एका अणुशास्त्रज्ञाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. या हत्याकांडामागे इस्रायल असल्याचा आरोप इराणने केला होता. इस्रायलने इराणच्या या आरोपांवर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने यासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते.
तर आत्ता ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीने देखील बायडेन प्रशासनातील सूत्रांच्या हवाल्याने या हल्ल्यांमागे इस्रायल असल्याचे म्हटले आहे. खोदाई किंवा इराणमधील इतर टार्गेटवर कारवाई करण्याआधी किंवा कारवाई झाल्यानंतरही इस्रायलने बायडेन प्रशासनाला कळविलेले नाही, असे अमेरिकन वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. त्यामुळे इराणच्या प्रश्नावर इस्रायल अजूनही बायडेन प्रशासनावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नसल्याचे दिसत आहे.