भारत व ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला चीनपासून सर्वाधिक धोका

- ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

नवी दिल्ली – ‘चीन हा भारत व ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेसाठी सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. 2020 साली चीनने भारताच्या एलएसीवर केलेल्या कारवाया आणि साऊथ चायना सीमधील चीनच्या हालचाली या देशाची आक्रमकता दाखवून देत आहेत’, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी दिला. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र धोरणात भारताला मध्यवर्ती स्थान असून दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरते, असेही ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांनी यावेळी ठासून सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस चार दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. सोमवारपासून सुरू झालेल्या दौऱ्यात त्यांनी आयएनएस हंसा या नौदलाच्या तळाला तसेच गोवा शिपयार्डला भेट दिली. त्यानंतर नवी दिल्लीत भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी भारत व ऑस्ट्रेलियातील द्विपक्षीय संरक्षण तसेच लष्करी सहकार्य भक्कम करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारत भेटीच्या अखेरच्या टप्प्यात माध्यमांशी बोलताना संरक्षणमंत्री मार्लेस यांनी चीनच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले. चीनची राजवट त्यांच्या विचारधारेनुसार जगाला आकार देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांनी यावेळी केला. त्याचवेळी भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांसाठी चीन हा सर्वाधिक चिंतेचा विषय ठरतो, याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधले.

‘ऑस्ट्रेलिया व भारत या दोन्ही देशांसाठी चीन हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. त्याचवेळी दोन्ही देशांच्या सुरक्षेसाठी चीन हा सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरतो. या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधणे ही सोपी गोष्ट नाही’, असे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी बजावले. चीनची आक्रमकता या क्षेत्राच्या संपन्नतेसाठी आवश्यक असणाऱ्या नियमांवर आधारित प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारी ठरते, असा दावा ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांनी केला.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता ऑस्ट्रेलियासाठी भारताबरोबर संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत, याकडे मार्लेस यांनी लक्ष वेधले.

leave a reply