पाकिस्तान-इराण संबंध अधिकच खालावले

karachi-blast-blamegameइस्लामाबाद – काही आठवड्यांपूर्वी कराची शहरात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तान आणि इराण या शेजारी देशांमधील संबंध अधिकच खालावले आहेत. कराची स्फोटासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना इराणमध्ये आश्रय आणि प्रशिक्षण मिळाल्याचा आरोप पाकिस्तान करीत आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा उघडपणे इराणवर दोष ठेवत आहेत. तर याआधी इराणने देखील पाकिस्तान दहशतवादी संघटनांना पाठिशी घालत असल्याचा ठपका ठेवून सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला होता.

जून महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमधील सदर बाजारात ‘आयईडी’चा स्फोट झाला होता. यामध्ये एकाचा बळी गेला तर 10हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी कराचीच्या मौरीपूर भागात केलेल्या कारवाईत दोघांना ठार केले. हे दोघेही स्वतंत्र सिंधूदेशची मागणी करणाऱ्या ‘सिंधूदेश रिपब्लिकन आर्मी-एसआरए’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप पाकिस्तानी यंत्रणांनी केला होता.

Karachi-bomb-blastsएसआरएच्या या दहशतवाद्यांना इराणमध्ये प्रशिक्षण मिळाल्याचा दावा पाकिस्तानने केला. त्याचबरोबर एसआरएचा प्रमुख असघर अली याला देखील इराणमध्ये आश्रय मिळाल्याचा ठपका पाकिस्तानी यंत्रणांनी ठेवला होता. यानंतर खवळलेल्या इराणने शंभरहून अधिक पाकिस्तानी निर्वासितांची हकालपट्टी केली होती. तसेच इराणमधील दहशतवादाला पाकिस्तान जबाबदार असल्याची टीका इराणने केली होती.

याआधीही इराणने पाकिस्तानवर दहशतवादाचा प्रायोजक देश असल्याचा आरोप केला होता. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी हल्ल्यांसाठी इराणने पाकिस्तानला जबाबदार धरले होते. तसेच सीमेवरील अमली पदार्थांच्या तस्करीसाठी इराणने पाकिस्तानवर ठपका ठेवला होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 2019 सालच्या इराण दौऱ्यात याची जाहीर कबुली दिली होती.

पाकिस्तानातील दहशतवादी इराणच्या सीमाभागात घातपात घडवित असल्याचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते. त्यांच्या या कबुलीमुळे इराणच्या आरोपांना दुजोरा मिळाला होता. तर पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या सीमेतील दहशतवाद्यांचे तळ बंद केले नाही तर, सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशाराही दिला होता. पुढच्या काळात पाकिस्तानने इराणबरोबर सहकार्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते.

पण अफगाणिस्तानात तालिबानची राजवट सत्तेवर आल्यानंतर व त्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इराणने पाकिस्तानवर तोफ डागली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून इराण व पाकिस्तानातील संबंधात तणाव निर्माण झाला होता. त्यातच कराचीतील स्फोटानंतर या तणावात भर पडल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply