इस्रायलचे लष्कर लेबेनॉनच्या बैरूतमध्ये पुन्हा चाल करू शकते

- इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

जेरूसलेम – इस्रायलला लेबेनॉनबरोबर शांती हवी आहे. पण हिजबुल्लाहने चिथावणी दिली तर इस्रायलचे लष्कर थेट बैरुतमध्ये घुसेल. त्यानंतर हिजबुल्लाहला जबर किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. त्याचबरोबर चार दशकांपूर्वी इस्रायलच्या लष्कराने लेबेनॉनवर चाल करून हिजबुल्लाहविरोधात केलेल्या कारवाईची आठवण इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी करुन दिली. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने देखील लेबेनॉनच्या सार्वभौमत्वाची सुरक्षा करण्यासाठी आपण तयार असल्याचे जाहीर केले.

1982 साली लेबेनॉनचे पहिले युद्ध पेटले होते. लेबेनॉनच्या दक्षिणेकडील भागातून इस्रायलच्या सीमाभागात सातत्याने रॉकेट हल्ले तसेच गोळीबार सुरू होता. लेबेनॉनमधील ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन-पीएलओ’ व हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना तसेच सिरियन सरकार या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. त्यानंतर इस्रायलने ‘ऑपरेशन पीस फॉर गॅलिली’ ही मोहीम छेडून लेबेनॉनमध्ये लष्कर घुसवून मोठे युद्ध छेडले होते.

किमान तीन महिने चाललेल्या या युद्धात इस्रायलचे साडेसहाशे जवान मारले गेले. तर 12 इस्रायली जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना तसेच सिरियन लष्कराला या संघर्षात मोठी जीवितहानी सोसावी लागली होती. या पहिल्या लेबेनॉन युद्धाला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इस्रायलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लेबेनॉनबरोबर शांती हवी असल्याचे स्पष्ट केले.

लेबेनीज जनतेशी इस्रायलचा कोणताही संघर्ष नाही, इस्रायलला लेबेनॉनबरोबर शांती प्रस्थापित करायची आहे. याबाबत इस्रायलने याआधीही आपली भूमिका मांडली होती, याकडे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी लक्ष वेधले. ‘मात्र हिजबुल्लाहने चिथावणी दिली तर इस्रायली लष्कर पूर्ण सामर्थ्याने लेबेनॉनमध्ये कारवाई करील. यासाठी हिजबुल्लाहला जबर किंमत मोजावी लागेल. या युद्धासाठी इस्रायल पूर्ण तयार असून इस्रायलचे जवान थेट लेबेनॉनची राजधानी बैरूतसह सिदॉन, तायर आणि त्याही पलिकडे चाल करुन जातील’, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी बजावले.

या इशाऱ्यानंतर हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने इस्रायलला धमकावले. लेबेनॉनच्या सार्वभौम सीमेच्या सुरक्षेला इस्रायलने आव्हान दिले तर हिजबुल्लाहकडून त्याला योग्य उत्तर मिळेल, अशी धमकी नसरल्लाने दिली. यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखाने गाझापट्टीतील हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याची भेट घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. लेबेनॉनमधील हिजबुल्लाहप्रमाने गाझातील हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांकडून इस्रायलच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याचा इशारा याआधीच देण्यात आला होता. इस्रायली लष्करानेही सर्व आघाड्यांवरील युद्धाची तयारी केल्याचे जाहीर केले होते.

leave a reply