एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवाद्यावरील कारवाईचीधूळफेक

इस्लामाबाद – नुकत्याच पार पडलेल्या एफएटीएफच्या बैठकीत आपल्या देशाला ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर काढण्याची घोषणा होईल, अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. तसे जाहीर होण्याच्या आधीच पाकिस्तानात याचा जल्लोषही सुरू झाला होता. पण एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवले. आता यातून आपली सुटका करण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद्यांवरील कारवाईच्या नाटकाचे नवे प्रयोग सुरू केलेआहेत. यानुसार मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार असलेल्या साजिद मीर याला पाकिस्तानच्या न्यायालयाने दुसऱ्या एका आरोपाखाली 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याचा आरोप सिद्ध झाल्याने पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने साजिद मीर याला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याच्या आधी साजिद मीर जिवंत नसल्याच्या वावड्या उठविण्यात आल्या होत्या. अधिकृत पातळीवरही पाकिस्तानने तशा स्वरुपाचे दावे केले होते. मात्र पाश्चिमात्य देशांनी याबाबतचे पुरावे मागितल्यानंतर पाकिस्तानची तारांबळ उडाली होती. त्यामुळे साजिद मीरला दुसऱ्याच प्रकरणात अपराधी ठरवून पाकिस्तानने त्याला शिक्षा सुनावल्याचे दिसत आहे.

हा सारा प्रकार आपण दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करीत आहोत, हे दाखविण्यासाठीच पाकिस्तान करीत असल्याचे दिसते. अन्यथा पाकिस्तानने 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील साजिद मीर याच्या सहभागासाठी त्याला कठोर शिक्षा सुनावली असती. पण पाकिस्तानने या दिशेने कुठलेही प्रयत्न केले नव्हते. आत्ता देखील एफएटीएफच्या दबावामुळे पाकिस्तानला साजिद मीरवर ही कारवाई करावी लागत आहे.

leave a reply