सेंकाकूच्या सुरक्षेसाठी जपान कठोर भूमिका स्वीकारील

-जपानचा चीनला इशारा

टोकिओ/बीजिंग – सेंकाकू द्वीपसमुहावर दावा सांगणाऱ्या आणि सदर क्षेत्रात विनाशिका रवाना करून तणाव वाढविणाऱ्या चीनला जपानने स्पष्ट शब्दात बजावले. ‘सेंकाकू द्वीपसमुह ऐतिहासिकदृष्ट्या जपानचा अविभाज्य भूभाग आहेत. आंतरराष्ट्रीय नियम देखील जपानच्या दावेदारीचे समर्थन करतात. असे असले तरी जपान आपला भूभाग, सागरी किंवा हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी शांतपणे पण कठोर भूमिका स्वीकारू शकतो’, असा इशारा जपानने दिला. सेंकाकूच्या हद्दीजवळून चीनच्या विनाशिकेने गस्त घातल्यानंतर जपानची ही प्रतिक्रिया आली आहे.

Senkaku-securityजपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी चीनच्या विनाशिकेने सेंकाकूच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास केला. चिनी विनाशिकेने किमान सहा मिनिटे या क्षेत्रात गस्त घातली. यानंतर जपानने आपल्या गस्तीनौका रवाना करून चीनच्या विनाशिकेला सदर सागरी क्षेत्रातून माघारी हटण्यास भाग पाडले. जपानच्या सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन चीनला फटकारले. तसेच यापुढे अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची चीनने काळजी घ्यावी, असे जपानने सुनावले.

तर जपान सरकारचे प्रवक्ते सेईजी किहारा यांनी ऐतिहासिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसासरही सेंकाकूवर जपानचा अधिकार असल्याची आठवण चीनला करून दिली. जपानच्या सागरी हद्दीजवळील चीनच्या या कारवाया खपवून घेतल्या जाणार नसल्याचे किहारा यांनी बजावले. तसेच यापुढेही जपानच्या हद्दीजवळ पुन्हा असा प्रकार घडला तर जपान शांतपणे पण कठोरतेने त्या कारवाईला उत्तर देईल, असे किहारा म्हणाले. त्यापाठोपाठ चीनने जपानला धमकावले.

दियोऊ बाबत बेजबाबदार विधाने करण्याचा जपानला कुठलाही अधिकार नसल्याचे चीनने म्हटले आहे. जपानसाठी सेंकाकू असलेल्या बेटांचा उल्लेख चीनमध्ये दियोऊ असा केला जातो. सदर दिओऊ द्वीपसमुह चीनच्या भूभागात असून या क्षेत्रातील चिनी जहाजांची हालचाल पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी केला. गेल्या महिन्यातही चीनच्या विनाशिकेने सेंकाकूच्या हद्दीत 60 तासांहून अधिक काळ गस्त घातली होती.

दरम्यान, अमेरिकेचे लक्ष युक्रेन युद्धाकडे केंद्रीत झाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या चीनने आपल्या शेजारी देशांविरोधातील आक्रमक हालचाली वाढविल्या आहेत. जपानप्रमाणे तैवानबाबतही चीनने असेच आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

leave a reply