वॉशिंग्टन – अमेरिकेत झालेला ‘मंकीपॉक्स व्हायरस’चा उद्रेक नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे, असा इशारा आघाडीच्या आरोग्यतज्ज्ञांनी दिला. चाचण्या तसेच लसींचा अभाव यामुळे हा अमेरिकेतील मंकीपॉक्सचा फैलाव वाढत असून लागण झालेल्या अनेकांची अद्याप चाचणी तसेच नोंदही झाली नसल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. अमेरिकेबरोबरच युरोपिय देशांमध्येही मंकीपॉक्सचा संसर्ग वाढत असून गेल्या दोन आठवड्यात युरोपमधील रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याचे उघड झाले. जगभरातील मंकीपॉक्सची रुग्णसंख्या सहा हजारांनजिक पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाही ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) अद्याप ‘साथी’ची घोषणा केली नसल्याने त्यावर जोरदार टीका होत आहे.
मे महिन्यात आफ्रिका खंडातील नायजेरियामधून ब्रिटनमध्ये आलेल्या एका व्यक्तीला ‘मंकीपॉक्स व्हायरस’ची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांमध्ये हा विषाणू 27 देशांमध्ये पसरला असून त्यात प्रामुख्याने युरोपिय देशांचा समावेश आहे. युरोपव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, लॅटिन अमेरिका तसेच आखाती देशांमध्येही याचे रुग्ण आढळले आहेत. जगातील 50हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण मिळाले असल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली. 1 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या नोंदींनुसार जगभरातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या 5,800 वर पोहोचली आहे.
अमेरिकेतील जवळपास सर्व प्रांतांमध्ये ‘मंकीपॉक्स’चे रुग्ण आढळत आहेत. सर्वाधिक रुग्ण कॅलिफोर्निया प्रांतात सापडले असून रुग्णसंख्या 90 झाली आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्या 460 झाल्याची माहिती ‘सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन’ या यंत्रणेने दिली. मात्र आरोग्यतज्ज्ञ ही आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करीत आहेत. अमेरिकेत होणाऱ्या चाचण्यांची संख्या तसेच लसीकरणाचा वेग अत्यंत मंद असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. त्यामुळे खऱ्या रुग्णांची संख्या कित्येक पट जास्त असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
‘अमेरिकेतील मंकीपॉक्सचा उद्रेक नियंत्रणाबाहेर गेला आहे. अमेरिकी यंत्रणा तो रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. सध्याच्या घडीला लसीकरणानेही फायदा होणार नसून, अमेरिकेकडे पुरेशा लसी उपलब्ध नाहीत’, अशी टीका ‘नॅशनल कोएलिशन ऑफ एसटीडी डायरेक्टर्स’चे संचालक डेव्हिड हार्वे यांनी केली.